पोटावरची चरबी ही सौंदर्यातली सर्वात मोठी अडचण. वजन वाढताना आधी पोटावरची चरबी वाढायला सुरुवात होते. पोट आणि कंबर या अवयवांवर आणि त्यांच्या आजूबाजूला चरबी साठू लागते. पोटावरची चरबी ही केवळ सौंदर्यातली अडचण नाही. वेळीच जर या समस्येवर उपाय केले नाहीत तर पोटावरच्या चरबीमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. रक्तातील साखर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हदयासंबंधीचे आजार या पोटावरच्या चरबीमुळे होतात, होऊ शकतात. सौंदर्य आणि आरोग्य या दोन्हींसाठी पोटावरची चरबी कमी होणं खूप गरजेचं असतं. आहाराचा विचार करता पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आहारातील कॅलरीजचं प्रमाण नियंत्रित ठेवायला हवं . शरीरात तेवढ्याच कॅलरीज जायला हव्यात जेवढ्या शरीर वापरेल. कॅलरीज वापरल्या गेल्या की त्याचं रुपांतर चरबीत होत नाही. पण पोटावरची चरबी केवळ आहाराचे नियम पाळून कमी होत नाही. त्यासाठी व्यायामही लागतो. आहार आणि व्यायामाचा समतोलच वजन कमी करतो , वजन नियंत्रणात ठेवतो. खास पोटावरची चरबी कमी करणारे व्यायाम केल्यानेही त्याचा फायदा होतो.
पोटावरची चरबी कमी करणारे व्यायाम
क्रंचेस:- पोटावरची चरबी कमी करणारा प्रभावी व्यायाम म्हणजे क्रंचेस. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर झोपावं. पाय गुडघ्यात दुमडावे. पावलं जमिनीवा टेकवलेली हवीत. दोन्ही हात उचलून डोक्याच्या खाली ठेवावेत. किंवा हात छातीवर क्रॉस करुनही ठेवता येतात. मंदगतीनं श्वसन चालू ठेवावं. पाय, नितंब यावर भार देऊन डोकं, पाठ शक्य असेल तितकी उचलून वर उठावं. डोकं गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करावा. डोकं गुडघ्यांना टेकत नाही पण त्या दिशेनं डोकं न्यावं. एका दमात किमान पंधरा ते वीस क्रंचेस करावेत. क्रंचेस करताना पोटाच्या स्नायुंवर ताण येतो.
चालणं:- हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. चालण्यानं पोटावरची चरबी कमी होते शिवाय आपण तंदुरुस्तही राहातो. संतुलित आहारासोबत रोज चालण्याचा व्यायाम केल्यास वजन लवकर घटतं. मोकळ्या हवेत रोज तीस मिनिट ब्रिस्क वॉकिंग केल्यास पोटाकडील चरबी घटण्यास मदत होते. शिवाय चालण्याच्या व्यायामामुळे चयापचयाची क्रिया सुधारते. हदयाच्या ठोक्यांची गती वाढते. चालण्यापेक्षाही धावणं हा पोटावरील चरबी जलद कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. चालणं- पळणं यामुळे केवळ पोटावरचीच नाहीतर शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
- झुम्बा:- व्यायाम म्हणजे शिक्षा नाही. व्यायामात मजा आणि आनंदही असायला हवा तर त्याचा फायदा आरोग्यास होतो. त्यादृष्टिकोनातून झूम्बा हा व्यायाम उत्कृष्ट आहे. झुम्बा हा गतीशील आणि अधिक ऊर्जा लागणारा व्यायाम आहे. या व्यायामानं हदयाचं आरोग्य नीट राहातं. कोलेस्ट्रॉल घटतं, रक्तातील साखर नियंत्रित राहाते. अभ्यासातून हे सिध्द झालं आहे की इतर कोणत्याही व्यायामापेक्षा झुम्बामुळे महिलांच्या पोटावरील चरबी कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे.
व्हर्टिकल लेग एक्ससाइज:- झोपून वर पाय उचलून करण्याचे व्यायाम हे पोटाच्या स्नायूंसाठी उत्तम असतात. यामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात, त्यांची क्षमता आणि ताकद वाढते. अशा व्यायामानं पोटावरची चरबी कमी होते. हा व्यायाम करताना जमिनीवर झोपावं. हात हे नितंबाच्या खाली ठेवावे. पाय हे काटकोनात वर उचलावे. गुडघे ताठ ठेवावेत. पाय वर उचलल्यानंतर काही सेकंद थांबावं. श्वास सोडत सावकाश पाय खाली आणावेत. पाय जमिनीवर न टेकवता पुन्हा काटकोनात वर उचलावेत. पाय एकमेकात क्रॉस करुनही हा व्यायाम करता येतो.
सायकलिंग:- पोटावरची चरबी ही सायकलिंग करुन पटकन घटवता येते. सायकलिंगमुळे हदयाचे ठोके वाढतात शिवाय उष्मांक जास्त जळतात. सायकलिंगमुळे मांड्या आणि कंबरेवरील वजन कमी होतं. रोज नियमित काही किलोमीटर सायकल चालवल्यास पोटावरची चरबी वेगानं कमी होते.
एरोबिक्स:- जीममधे जाऊन पोटावरची चरबी कमी करण्याची इच्छा नसेल तर घरी व्यायाम करुनही हे साध्य करता येतं. एरोबिक्ससारखे हाय इंटेन्सिटीचे व्यायाम त्यासाठी परिणामकारक मानले जातात. हा व्यायाम करताना मनाला आनंद वाटतो, मजा येते आणि वेगानं शरीरातील उष्मांक जळतात.
पुश अप्स- हा व्यायाम प्रकार सोपा नाही पण आपल्या क्षमतेनुसार आणि आवडेल त्या प्रकारानुसारही हे पुश अप्स करता येतात. जमिनीवर हात ठेवून किंवा भिंतीचा, खूर्चीचा आधार घेऊन पुश अप्स करता येतात. पुश अप्स हा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक व्यायाम मानला जातो. हा व्यायाम आपली क्षमता वाढवतो.
नृत्य- नृत्याचे काही प्रकार पोटावरची चरबी आणि एकूणच शरीराचं वजन कमी करण्यास उपयुक्त असतात. जसे सालसा, कथक, हिप हॉप हे प्रकार पोटावरची चरबी सहज कमी करतात. फक्त यासाठी रोज अर्धा तास नृत्याचा व्यायाम करायला हवा.