'बडे ....अच्छे लगते है....' हे म्युझिक ऐकू आलं की कधीकाळी बहुतेक सगळ्याच घरातल्या बायका हातातलं काम सोडायच्या आणि पटापट टीव्हीसमोर येऊन बसायच्या. राम हा त्यांचा अगदी फेव्हरेट होता.. आपण जाड झालो, याचा थोडा जरी कॉम्प्लेक्स आला, तरी रामला पाहिले की समाधान वाटायचे. बायकाच नाही पण पुरूषही त्याच्याकडे पाहून आपण त्याच्यापेक्षा कमी जाड आहोत, म्हणून खुश व्हायचे. पण हे खुश होण्याचे दिवस आता सरले बरं का... कारण रामची मालिका पाहत पाहत आपला घेर पुष्कळ वाढत गेला असला तरी राम मात्र आता एकदम फिट झाला आहे....
काही वर्षांपुर्वी रामचे वजन १२० किलो होते. एवढे जास्त वजन असणारा तो कधी काळचा एकमेव नायक होता. या वजनाचा त्याला खूप त्रासही व्हायचा आणि आपण कधी बारीक होऊ शकू की नाही, असा प्रश्नही तो स्वत:ला खूपदा विचारायचा. पण त्याचं वजन त्याने चांगलच सिरिअसली घेतलं आणि चक्क १६- १६ तास उपाशी राहून त्याने ३० किलो वजन घटवलं. आता रामचे दिवस चांगलेच पालटले आहेत. कारण कधीकाळी स्वत:च्या वजनाबाबत इतका त्रस्त असणारा राम आता मात्र सोशल मिडियावरून त्याच्या फॅन्सला वजन कमी करण्याच्या टिप्स आणि फिटनेस गोल देत असतो.
असे आहे रामचे रूटीन
सकाळी उठल्यावर राम सगळ्यात आधी जीम गाठतो. जीमला जाण्यापुर्वी तो काहीही खात नाही. जीममध्ये खूप हेवी वेट ट्रेनिंग करूनच त्याचा दिवस सुरू होतो. रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा राम इंटेन्स कार्डियो वर्कआऊट करतो. याशिवाय रनिंग, स्विमिंग अशा ॲक्टिव्हीटीही तो आवर्जून करत असतो. रामचा दिवस वर्कआऊटने सुरू होतो आणि वर्कआऊटनेच संपतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
रामने फॉलो केलेला डाएट प्लॅन
दिवसाचे ७ ते ८ तास काहीतरी खायचे आणि १६ तास पुर्णपणे उपाशी रहायचे, असा डाएट प्लॅन राम स्टिक्टली फॉलो करत होता. डाएटींगच्या या काळात त्याने गोड पदार्थ, डेअरी पदार्थ, कार्ब्स, तेलकट- तुपकट असे सगळेच पुर्णपणे बंद केले होते. अशा प्रकारचे हेवी डाएटींग जेव्हा केले जाते, तेव्हा आपण काय आणि किती खातो, याला प्रचंड महत्त्व असते. म्हणूनच रामचे हे डाएट आपणही करून बघूया, असा विचार करत असाल, तर खाण्या- पिण्यावर खूपच कंट्रोल करावा लागेल.