'मी तर बाई जाडच आहे, त्यामुळे मला ना कसला व्यायाम करता येतो, ना आवड असूनही डान्स करता येतो... ' अशा प्रकारचे वाक्य एखाद्या लठ्ठ असणाऱ्या बाईच्या तोंडून आपण अनेकदा ऐकतो. जाड आहोत म्हणून आपण अमूक अमूक गोष्टी अजिबातच करू शकणार नाही, हे त्यांनी त्यांच्या मनाशी अगदी पक्के ठरविलेले असते. जाड असण्याचा कॉम्प्लेक्स दिवसेंदिवस त्यांना अधिक छळत राहतो. पण जाड असण्याचा न्युनगंड मनातून काढून टाका. कारण बारीक आणि जाड असण्यापेक्षा तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात, हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वांची लाडकी 'स्वीटू' म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या डान्सचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अन्विता ही खूपच चांगली डान्सर आहे, हे तिने यापुर्वीही शेअर केलेल्या व्हिडियोतून दिसतेच आहे. तर नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडियोमध्ये अन्विताने पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट घातला असून ती 'झोकां हवाँ का आज भी....' या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करताना दिसते आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय बोलके असून या व्हिडियोमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे अन्विताची लवचिकता.
तिच्या नृत्यामध्ये तिची जाडी अजिबातच अडसर ठरलेली नाही. उलट एखाद्या सडपातळ मुलीलाही जमणार नाही, इतकी सहजता अन्विताच्या नृत्यामध्ये दिसत आहे. तिचे नृत्य अतिशय ग्रेसफुल झाले आहे. जाड असलो म्हणून काय झाले, आपणही अतिशय सुंदर नृत्य करू शकतो, हेच हा व्हिडियो पाहून कुणालाही अगदी सहज जाणवते. याविषयी सांगताना फिटनेस तज्ज्ञही सांगतात की जाड असणे वेगळे आणि स्थूलता असणे वेगळे. जर बारीक असूनही तुम्ही अजिबातच लवचिक नसाल, तर बारीक असण्याचा काहीच उपयोग नाही. लवचिकता ही तुमच्या शरीराची ताकद दाखवते आणि तुम्ही बोजड नाहीत, हेच यावरून दिसून येते.