प्रत्येकाची दिनचर्याच अशी झालेली आहे, की तासनतास एकाच जागी बसून काम करावे लागत आहे. नोकरदार मंडळी तर सतत ८- १० तास स्क्रिनसमोर बसून असतात. बसताना चुकीचे बॉडीपोश्चर आणि त्याच पोझिशनमध्ये खूप वेळ बसल्याने हळूहळू मग मान, पाठ, कंबरदुखी डोके वर काढू लागते. कधी कधी तर मागचा सगळा भाग इतका आखडून जातो की हालचाल करणेही अवघड होते. हाच त्रास कमी करण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने काही सोपे व्यायाम सांगितले आहेत. (back pain due to maximum sitting hours)
भाग्यश्री सोशल मिडियावर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असून ती दर आठवड्यात तिच्या चाहत्यांसोबत काही हेल्थ टिप्स शेअर करत (health tips by Bhagyashree) असते. असाच एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये तिने शरीर आखडून गेले असेल तर कोणते व्यायाम प्रकार करायला पाहिजे, हे सांगितले आहे. हे सगळे व्यायाम पाठदुखी, कंबरदुखी तर थांबवतीलच पण शरीराची लवचिकता वाढविण्यासाठीही मदत करतील, असं भाग्यश्री म्हणते.
भाग्यश्रीने सांगितलेले व्यायाम१. हे व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. यानंतर वज्रासनातून गुडघ्यावर उभे रहा. पुन्हा वज्रासनात बसा. ही क्रिया १० वेळा रिपिट करा. उभे राहताना हात खाली करा आणि वज्रासनात बसल्यावर हात छातीजवळ घेऊन एकमेकांना जोडा.२. दुसरा व्यायाम करताना वज्रासनातून गुडघ्यावर उभे रहा. एक पाय पुढे करून त्याचा तळवा जमिनीवर टेकवा आणि संपूर्ण शरीर पुढे करून स्ट्रेचिंग करा. हा व्यायाम करताना हात पुढे टेकवू नका. दोन्ही पायांनी १०- १० वेळा व्यायाम रिपिट करा.३. तिसरा व्यायाम करताना हात सरळ वर घेऊन एकमेकांमध्ये गुंफून घ्या. वज्रासनातून गुडघ्यावर उभे रहा. यानंतर दोन्ही पायांवर बसण्याऐवजी एकदा डावीकडे तर एकदा उजव्या बाजूने बसण्याचा प्रयत्न करा.
हे व्यायाम करण्याचे फायदे१. शरीराची लवचिकता वाढेल२. वाढत्या वयासोबत शरीर आखडत जाते. असा त्रास होऊ द्यायचा नसेल तर हे व्यायाम नियमित करा.३. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होईल.४. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी होईल.५. बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होईल.
सूचना- ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हा व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी.-गुडघ्याखाली उशी किंवा एखाद्या टॉवेल, बेडशीटची जाडसर घडी ठेवावी आणि त्यानंतरच व्यायाम करावा.- तिव्र गुडघेदुखी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम करावा.