Join us  

पायाच्या अंगठ्याचे हाड वाढून खूप बाहेर आले? भाग्यश्री सांगते ३ सोपे व्यायाम, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 9:44 AM

Actress Bhagyashree Suggest exercise for bunions problem : आरोग्याच्या लहान वाटणाऱ्या समस्यांसाठी परफेक्ट उपाय..

आपल्यापैकी काही जणांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूला असणारे हाड जास्त बाहेर असते आणि अंगठा आतल्या बाजूला वळलेला असतो. कधी ही ठेवण जन्मापासून असते तर कधी ती नंतर काही कारणांनी निर्माण होते. सतत उभे राहण्याचे काम असणाऱ्यांमध्ये बरेचदा पायाची अशाप्रकारची ठेवण असल्याचे दिसते. पायावर सतत येणारा भार हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण असू शकते. तसेच चालण्याची किंवा उभे राहण्याची चुकीची पद्धत, सतत बंद शूजचा वापर या गोष्टीही या समस्येसाठी कारणीभूत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे (Actress Bhagyashree Suggest exercise for bunions problem). 

भाग्यश्री नेहमीच फिटनेसबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देत असते. त्याचप्रमाणे आताही तिने या बाहेर आलेल्या हाडाबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. काही जणांना हे बाहेर आलेले हाड दुखते. तर काही जणांना फॅशनेबल चपला घालताना त्या हाडाचा अडथळा येऊ शकतो. बरेचदा उभे राहिल्यावर पायाचा शेप या हाडामुळे थोडा वेगळा दिसण्याची शक्यता असते. हे सगळे स्वाभाविक असले तरीही यामुळे आरोग्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी भाग्यश्रीने ३ सोपे व्यायामप्रकार सांगितले आहेत. ज्यामुळे हे हाड जास्त प्रमाणात वाढणार नाही आणि दुखणारही नाही. पाहूयात हे व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे. 

(Image : Google )

१. अंगठा आणि इतर चार बोटे यांच्यात अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. बोटे एकमेकांना जोडलेली असल्याने हे दिसते तेवढे सोपे नाही. पण पाय जमिनीवर ठेवून मुद्दामहून आपल्याला इतर ४ बोटे अंगठ्यापासून लांब आणि जवळ आणता यायला हवीत. 

२. एकदा अंगठा वर उचला आणि नंतर इतर ४ बोटे वर उचला. अंगठा जमिनीपासून वर घेऊन तो इतर बोटांच्या बाजूला वळवायला हवा. तर इतर बोटे वर घेऊन ती अंगठ्याच्या बाजुला वळवायला हवीत. यामुळे या हाडाला नकळत व्यायाम होण्यास मदत होते. 

३. पाय अंगठ्याच्या बाजुने वर उचलून पावलाच्या बाहेरच्या कोपराच्या बाजूला वळवा. पावलाच्या बाजूवर पायांचा भार घेऊन काही सेकंद, मिनीटे होल्ड करण्याचा प्रयत्न करा. यामुळेही अंगठ्याच्या बाजूला असलेले हे हाड दुखण्यापासून तुमची सुटका होऊ शकते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआरोग्यभाग्यश्री