चमकदार त्वचा हे आरोग्यदायी त्वचेचं मुख्य लक्षण. ही चमकदार त्वचा फक्त सौंदर्योपचार करुन मिळते असं नाही तर सौंदर्यासाठी व्यायामही महत्त्वाचा असतो. अभिनेत्री मलायका अरोरा हेच सत्य सांगते. इतकंच नाही तर चमकदार त्वचेसाठी योगासनातील तीन आसनं ही उपयोगी असल्याचं ती म्हणते. सध्या कोविडमुळे पार्लर, स्पा सर्वच बंद आहेत. त्यामुळे सौंदर्योपचारांचे मार्गच खुंटले आहेत. पण मलायका म्हणते की म्हणून निराश होण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या व्यायामात सर्वांगासन, हलासन आणि त्रिकोणास्न या तीन योग आसनांचा समावेश केला तर त्याचा फायदा त्वचेला होतो. आणि हा फायदा सौंदर्योपचारांप्रमाणे अल्पकाळ टिकत नाही तर या आसनांतून त्वचेला होणारे फायदे दीर्घकाळ टिकणारे असतात.
‘मलायका मूव्हज ऑफ द वीक’ या सीरीजच्या माध्यमातून मलायकाने चमकदार त्वचेसाठी योगासानातील तीन आसनांचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं आहे. याबाबतची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. उन्हाळ्याचा सामना करताना आधी रोज भरपूर पाणी पिऊन आपली त्वचा ओलसर ठेवण्याचा सल्ला मलायका देते. आणि मग चमकदार आरोग्यदायी त्वचेसाठी तीन आसनांचं प्रात्यक्षिक दाखवते. मलायका म्हणते, की सर्वांगासन, हलासन आणि त्रिकोणासन ही तीन आसनं शारीरिक लाभासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत. या तीन आसनांमुळे आपलं रक्त शुध्द होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली त्वचा छान होते.
त्वचा सुंदर करणारी आसनं
सर्वांगासन
सर्वांगासन म्हणजे खांद्यावरची उभी अवस्था. या आसनाचा फायदा म्हणजे रक्तप्रवाह सुधारतो. चेहेऱ्याला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. त्वचेचा पोत आणि गुणवत्ता सुधारते. त्वचेवरील सुरकुत्यास हेआसन प्रतिबंध करतं. हे आसन करताना आधी पाठीवर सरळ झोपावं. काटकोनात पाय सरळ वर उचलावेत. पाय दुमडू नये. दोन्ही हातांनी कंबरेच्या वरच्या बाजूला पकडावं. शरीराचा संपूर्ण भाग हाताच्या कोपरावर उचलून खांद्यापर्यंत शरीर उचलावं. हे आसन करताना डोकं हे जमिनीवर टेकलेलं असतं. या अवस्थेत किमान दोन ते तीन मिनिटं राहावं. मग कंबरेवरचे हात काढून घेवून सावकाश आसन सोडावं. आसन सोडताना पाय एकदम जमिनीवर टेकवू नये. आधी पाठ, मग कंबर आणि मग पायम जमिनीला टेकवत आसन सोडावं.
हलासन
हलासन करताना पोटावर ताण पडतो. बध्दकोष्ठता होत नाही. पोट साफ राहिलं तर त्वचाही चमकदार आणि चांगली दिसू लागते. हे आसन करताना पाठीवर झोपावं. दोन्ही हात कंबरेजवळ सरळ ठेवावेत. मग दोन्ही पाय कंबरेला हातांचा आधार देत वर काटकोनात उचलावेत, मग दोन्ही पाय डोक्याच्या मागील बाजूस न्यावेत . आणि जमिनीला पायाचे अंगठे टेकवण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हात एकमेकात गुंफलेले असावेत किंवा आडव्या नमस्कार स्थितीत ठेवावेत, सुरुवातीला हलासन करताना थोडं अवघड जातं . पण रोजच्या सरावानं शरीर लवचिक होतं आणि आसन सहज जमतं. हे आसन करताना पोटावर ताण पडतो. पोट कमी होण्यासही हे आसन उपयोगी ठरतं. हे आस्न दोन ते पाच मिनिट ठेवावेत. आसन सोडताना सावकाश सोडावं आधी पाय काटकोनात आणावे. मग हाताचा टेकू काढून घेऊन आधी पाठ मग कंबर टेकवत सावकाश पाय जमिनीवर टेकवावेत.
त्रिकोणासन
त्रिकोणासणाचा उपयोग हदयाचं कार्य सुधारण्यास होतो. हदयाला लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती अधिक होते. ऑक्सिजन हे त्वचेसाठी फारच गरजेचे असते. रक्तातील ऑक्सिजन वाढलं की त्वचा चमकदार होते. डोळ्यांखालील काळी वर्तुळ जाण्यास या आसनाने मदत होते. हे आसन दोन पध्दतीनं करता येतं. आधी ताठ उभं राहावं. दोन पायात खांद्याएवढं अंतर ठेवावं. ज्या बाजूनं वाकायचं आहे तो हात कंबरेत वाकून पावलावर ठेवावा. दुसरा मोकळा हातही पावलावर ठेवावा. दुसऱ्या पध्दतीनं हे आसन करताना बाकी सर्व क्रिया तशीच करावी. फक्त मोकळ्या हाताची पोझिशन ( स्थिती) बदलावी. मोकळा हात पावलावर न ठेवता वर हवेत ताठ ठेवावा. आणि मानही ताठ हाताच्या दिशेनं वर असावी. या आसनात दोन मीनिटं थांबावं. या आसनानं हात आणि मानेवर ताण जाणवतो.