वर्क फ्रॉम होम करताना दररोज चुकीच्या पद्धतीने बसल्या जात असल्यामुळे, दररोजच खूप जास्त ड्रायव्हिंग करावं लागल्याने किंवा आजवर आपण कसे बसतो, कसे चालतो, कसे उभे राहतो, याकडे खूप गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे आपलं बॉडी पोश्चर चुकीचं होतंय, असं जाणवू लागतं. बसण्या- उठण्याची, चालण्याची ढब एकदम बदलणं हे वरवर दिसतं तेवढं सोपंही नसतं कारण तो आपल्या सवयीचा भाग झालेला असतो. म्हणूनच तर बॉडी पोश्चर (wrong body posture) सुधारण्यासाठी कोणती योगासनं केली पाहिजेत, हे शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.
शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देत असते. ती आज काय फिटनेस मंत्र देणार याकडे दर सोमवारी तिच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार शिल्पाने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पा म्हणतेय की तुमच्या दिवसाची सुरुवात योगासने करून होणे, यापेक्षा उत्तम काहीही नाही. यामुळे तुमचे मन, शरीर तयार होते.
शिल्पाने या व्हिडिओमध्ये वृक्षासन, वीरभद्रासन आणि नटराजासन करून दाखवले आहे. ती म्हणते की ही योगासने केल्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर तर सुधारेलच पण त्यासोबतच तुमचे पायाच्या घोट्याचे जॉईंट्स तसेच हिप्स व लेग मसल्स स्ट्राँग होतील. शरीराची लवचिकता, एकाग्रता, संतुलन आणि बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ही ३ आसने मदत करतात, असं शिल्पाने सांगितलं आहे. पायांवरची अतिरिक्त चरबी कमी करून पाय सुडौल होण्यासाठी म्हणजेच लेग टोन्ड होण्यासाठी ही ३ आसने उपयुक्त ठरतात.
१. कसे करायचे वृक्षासन (How to do vrikshasana)?
- वृक्षासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर उजवा पाय उचला आणि तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात सरळ वर उचला आणि हाताचे तळवे एकमेकांना जोडून नमस्काराची पोझ करा. हे आसन करताना पाठीचा कणा ताठ ठेवा. ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवल्यानंतर आता दुसऱ्या पायाने अशाच पद्धतीने वृक्षासन करा.
२. कसे करायचे वीरभद्रासन (How to do Veer bhadrasana)?
वीर भद्रासन करण्यासाठी आधी ताठ उभे रहावे. यानंतर उजवा पाय हळूहळू शरीराच्या मागे उचलून न्यावा आणि कंबरेपासून सगळे शरीर पुढे वाकवावे. यानंतर दोन्ही हात समोर घेऊन हातांचे तळवे एकमेकांना जोडून नमस्काराची अवस्था करावी. उजवा पाय मागच्या बाजूला सरळ ताठ असावा तसेच पाठीच्या कण्यातही बाक नसावा. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर अशाच पद्धतीने डावा पाय उचलून उजव्या पायावर शरीराचा भार सांभाळावा आणि आसन करावे.
३. नटराजासन करण्याची योग्य पद्धत (How to do Veer Natarajasana?)
सगळ्यात आधी सरळ उभे रहा. यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकवा आणि तो मागच्या बाजूने वर उचलण्याचा प्रयत्न करा. यानंतर उजवा हात मागे न्या आणि उजव्या पायाचा तळवा पकडण्याचा प्रयत्न करा. डावा हात समोर ठेवा. डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा एकमेकांना जाेडून घ्या आणि या हातावर लक्ष केंद्रित करा. शरीराचा सगळा भार डाव्या पायावर पेला. ३० सेकंद हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर असेच आसन डावा पाय उचलून करा.