Join us  

शिल्पा शेट्टी सांगतेय, स्ट्रेचिंग करुन दिवसाची सुरुवात करणे सगळ्यात उत्तम! स्ट्रेचिंगचे फायदे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 6:07 PM

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या चाहत्यांसाठी नुकतेच एक फिटनेस मोटीव्हेशन दिले आहे. यामध्ये तिने स्ट्रेचिंग करण्याचे फायदे सांगितले आहेत.

ठळक मुद्देनियमित स्ट्रेचिंग केल्यास शरीरावर अतिरिक्त चरबी साठत नाही. शरील सुडौल आणि लवचिक राहण्यास मदत होते. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. पती राज कुंद्रा याच्यामुळे शिल्पा शेट्टीला मध्यंतरीच्या काळात मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागले. तिच्यावर टिकादेखील खूप झाली. या सर्व कठीण परिस्थितीत मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वत:ला सकारात्मक आणि संयमी, संतुलित ठेवण्यासाठी योगसाधनाच कामी आली, असे देखील शिल्पाने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक पोस्ट टाकून सांगितले होते. आता शिल्पा शेट्टीने तिचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आता याद्वारे ती तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देऊ पाहत आहे.

 

या व्हिडियोद्वारे शिल्पाने स्ट्रेचिंगचे महत्त्व सांगितले आहे. यामध्ये शिल्पा सांगते की स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे. दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंगद्वारे करणे हा अतिशय चांगला प्रकार असून स्ट्रेचिंग नेहमी सकाळच्या वेळी करण्यास प्राधान्य द्यावे. सकाळच्या मंद गारव्यात, मोकळ्या हवेत, सुर्यप्रकाश घेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत स्ट्रेचिंग करणे हा सगळ्यात छान अनुभव आहे, असे देखील शिल्पाने या पोस्टद्वारे सांगितले आहे.

 

या व्हिडियोमध्ये शिल्पाने उत्तान प्रस्थासन करून दाखवले आहे. स्ट्रेचिंग प्रकारात येणारे हे आसन करण्याचे अनेक फायदे आहेत असेही शिल्पा म्हणते. उत्तान प्रस्थासन किंवा लिझार्ड पोज या नावाचा हा अतिशय अवघड स्ट्रेचिंग प्रकार शिल्पा अत्यंत सहजतेने करताना दिसते. आसन करताना तिची लयबद्ध हालचाल आणि अगदी सहजपणे होऊन जाणारे आसन तिचा फिटनेस दाखवणारी आहे. सुरुवातीचे काही दिवस नियमित व्यायाम केल्यानंतरच हा आसनप्रकार करता येतो. हे आसन करायचे असेल तर ते सुरुवातीला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे, असेही शिल्पाने सांगितले आहे. 

 

स्ट्रेचिंग करण्याचे फायदे१. संपूर्ण शरीराचा व्यायाम होण्यासाठी स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो.२. ज्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांनी १५ मिनिटे जरी वेळ काढून स्ट्रेचिंग केले तरी त्याचे शरीराला पुष्कळ लाभ होतात.३. स्ट्रेचिंगदरम्यान स्नायूंवर ताण येऊन शरीराची लवचिकता वाढते.४. स्ट्रेचिंगमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होऊ लागतो.५. नियमित स्ट्रेचिंग केल्यास शरीरावर अतिरिक्त चरबी साठत नाही. शरील सुडौल आणि लवचिक राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीयोगवेट लॉस टिप्स