Join us  

लेकीच्या जन्मानंतर दीड महिन्यात व्यायामाला सुरुवात करत आलियाचा बायकांना खास सल्ला, सोसेल तसा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 11:20 AM

Alia Bhatt Suggestion To Mothers After Pregnancy Fitness : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दिड महिन्यांतच आलियाने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देबाळाचा जन्म हा प्रत्येक स्त्रीसाठी एक चमत्कार असून आपल्या शरीरावर प्रेम करणे आणि शरीराला पाठिंबा देणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वत: व्यायाम करत आलिया महिलांना व्यायामाचे महत्त्व पटवून देते

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट ही तिच्या अभिनयामुळे तर प्रसिद्ध आहेच. पण तिच्या फिटनेससाठीही ती बरेचदा चर्चेत असते. फिटनेसबाबत आलिया बरीच जागरुक असून ती करत असलेला योगा, इतर व्यायामप्रकार याचे व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस कोच अंशुका परवानी हिच्याकडे आलिया मागील बराच काळापासून फिटनेसचे धडे घेत आहे. अवघ्या दिड महिन्यापूर्वीच आलिया आणि रणबीरला मुलगी झाली. प्रेग्नंट असतानाही आलिया अगदी शेवटपर्यंत काम करत होती, इतकेच नाही तर या काळातही आलियाचे आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिसत असल्याचे दिसले. आता राहा अवघ्या दिड महिन्याची झाली असताना आलियाने पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे (Alia Bhatt Suggestion To Mothers After Pregnancy Fitness). 

(Image : Google)

गेल्या काही दिवसांपासून तिचे व्यायामाला जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आलियाने पॉवर योगा आणि एरीयल योगा करतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये आलियाने बाळंत झालेल्या महिलांना फिटनेसबाबत खास सल्ला दिल्याचे दिसते. आलिया म्हणते बाळंतपणानंतर आपल्या शरीराचे ऐकणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं मन तुम्हाला एखादी गोष्ट करु नका असं सांगत असेल तर ते ऐका आणि ती गोष्ट करु नका असंही ती सांगते. 

 

मुलगी झाल्यानंतर पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात आपण श्वासनाचे आणि चालण्याचे व्यायामप्रकार केले, मात्र अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे असे सांगत तुम्ही स्वत:चा वेळ घ्या आणि तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे कौतुक करा. यावर्षी बाळंतपण झाल्याने मी फिटनेसबाबत फारसा कठोरपणा न करण्याचे ठरवले असल्याचेही ती सांगते. बाळाचा जन्म हा प्रत्येक स्त्रीसाठी एक चमत्कार असून आपल्या शरीरावर प्रेम करणे आणि शरीराला पाठिंबा देणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते त्यामुळे व्यायामाशी निगडीत कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा असेही ती सांगते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सप्रेग्नंसीआलिया भट