'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलिया भट हीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. यापुढे गंगुबाई, २ स्टेट, गल्ली बॉय, राझी यांसारख्या सिनेमात आपल्या भूमिकांनी एक वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आलिया भट बरीच ग्लॅमरस आहे. आपला हा ग्लॅमरस लुक मिळविण्यासाठी तिने बरीच मेहनत केली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया फिट नव्हती फॅट होती. परंतु चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवण्याआधी तिने तब्बल १६ किलो वजन कमी केले होते. याची चर्चा सर्वत्र होती. आलियाने हे वजन अगदी कमी कालावधीत उतरवले होते. हे वजन कमी करत असताना तिने एक प्रतिक्रिया दिली होती की, "हात जाड दिसतात किंवा पोट सुटले आहे, याचा विचार मी करत नाही. फक्त हेल्दी आणि फिट राहण्यावर माझा विश्वास आहे." आलियाचे रेग्यूलर जिममध्ये एक्सरसाइज आणि योगा करतानाचे व्हिडिओ आपण बघतो. जिमसोबतच ती आपले डाएटसुद्धा अगदी काटेकोपरपणे पाळताना दिसते. आपण डाएट करत असताना आपल्याला खाण्यावर काही बंधन येतात. काही पदार्थ खूप आवडून पण ते टाळावे लागतात. नाश्त्यामध्ये बरेच असे साऊथ इंडियन पदार्थ आहेत जे आपल्याला खायला आवडतात. पण आपण डाएटमुळे खाऊ शकत नाही. अशावेळी आलिया भट नक्की काय करते? हे समजून घेऊयात(Alia Bhatt Favourite South Indian Dishes For Weight Loss).
१. साऊथ इंडियन स्टाईल झुकिनी - झुकिनीमध्ये, सगळ्यात कमी कॅलरीज असून त्यात फायबरचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. यामुळे आलिया आपल्या डाएटमध्ये, साऊथ इंडियन स्टाईल झुकिनीच्या भाजीचा समावेश करते.
साऊथ इंडियन स्टाईल झुकिनी कशी करावी ?
एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यात राई, हिरव्या मिरच्या, धणे पावडर, जिरं पावडर, घालून चांगली फोडणी द्या. चवीनुसार मीठ घालून मग झुकिनीचे लहान - लहान तुकडे करून घाला. भाजी झाल्यावर वरून कोथिंबीर घाला. साऊथ इंडियन स्टाईल झुकिनीची भाजी तयार आहे.
२. रस्सम - झुकिनीप्रमाणेच रस्सम मध्येसुद्धा फार कमी कॅलरीज असतात. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण सर्वात जास्त असते. जर तुम्हाला पोट आणि गॅसेस संबंधित काही आजार असेल तर रस्समचे सेवन केल्याने हा त्रास दूर होण्यास मदत होते.
रस्सम कसे बनवावे ?
एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल घेऊन राई, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता यांची फोडणी द्या. त्यानंतर टोमॅटोच्या लहान फोडी घालून घ्या. मग चवीनुसार चिंचेचा कोळ, पाणी, मीठ घालून घ्या. रस्सम खाण्यासाठी तयार आहे.
३. नाचणीची इडली - नाचणीची इडली ही वजन कमी करण्यासाठी बेस्ट ग्लूटेन - फ्री डिश आहे. ही इडली म्हणजे फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. नाचणीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या इडल्या खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट खूप वेळासाठी भरलेलं राहील.
नाचणीची इडली कशी बनवावी?
नाचणी, तांदूळ, उडद डाळ, आणि मेथीचे दाणे हे २ ते ४ तासांसाठी भिजत ठेवून त्याचे मिक्सरमध्ये, जाडसर बॅटर तयार करून घ्या. हे बॅटर आंबविण्यासाठी एक रात्रभर तसेच ठेवून घ्या. दुसऱ्या दिवशी इडली पात्रात हे बॅटर घालून इडल्या तयार करून घ्या.
४. केटो उपमा - केटो उपमा हा कॉलीफ्लॉवर राईस पासून तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी ग्लुटेन - फ्री पदार्थ खाण्याकडे जास्त भर दिला जातो. केटो उपमा ही त्यांपैकी एक महत्वाची डिश आहे.
केटो उपमा कसा बनवावा ?
एका भांड्यात नारळाचे तेल घेऊन त्यात राई, बारीक किसलेलं आलं, कढीपत्ता, लाल मिरची यांची फोडणी द्या. मग तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घाला. सगळ्यात शेवटी कॉलीफ्लॉवर राईस घालून घ्या. तुमचा केटो उपमा तयार आहे.