Join us  

खूप मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा व्यायाम सुरु करताय? मग अडचणी येणारच, त्यावर हे काही सोपे उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 5:17 PM

एकदा का व्यायामात एक आठडा, पंधरा दिवस किंवा महिन्याभराचा मोठा ब्रेक झाला तर व्यायामाची आवड असणाऱ्यांनाही पुन्हा जोमानं व्यायामाला लागण्यात अडथळे येतात. पण तज्ज्ञ मोठ्या विरामानंतर नियमित व्यायामाकडे परतण्याचे सोपे मार्ग सांगतात. त्यामुळे व्यायामात मोठया कालखंडचा विराम गेला तरी व्यायाम नव्यानं नियमित सुरु करता येतो.

ठळक मुद्देआधी स्वत:ला सांगा आपल्याला आता व्यायाम सुरु करायला हवा. स्वत:साठी काही ध्येयं निश्चित करा. आपण जो व्यायाम प्रकार करता त्यात मला येत्या आठवड्यात अमूक तमूक वेळात एवढं लक्ष गाठायचं आहे असं ठरवा.जेव्हा महिना दोन महिने एवढा मोठा व्यायाम विराम असेल तर पुन्हा नव्यानं सुरुवात करताना आधी जेवढं करत होतो त्याच्या ५० टक्के व्यायाम करुन सुरुवात करावी. आणि मग दर आठवड्याला १० ते १५ टक्के त्यात वाढ करावी.पूर्वी ज्याप्रमाणे एक सलग वेळ देऊन विशिष्ट वेळेत व्यायाम व्हायचा तसं आता होत नसेल तर व्यायाम टाळण्यापेक्षा सरळ व्यायामाचे छोटे छोटे तुकडे करुन ,दिवसाच्या वेवेगळ्या वेळेत व्यायाम केला तरी चालतो.

 नियमितता हे व्यायामाचं मुख्य सूत्र आहे. आठवड्यातून एकदा दोनदा, महिन्यातून काही दिवस असा अनियमित व्यायाम केल्यास त्याचा फायदा शरीराला होत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ नेहेमी म्हणतात की थोड का होईना रोज व्यायाम करायला हवा.व्यायामात नियमितता हवी. आपल्या वेळ आणि क्षमतेनुसार अनेकजण नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अनेक कारणांनी या नियमित व्यायामात खंड पडू शकतो. लग्न समारंभ, बाहेरगावी जाणं, स्वत:चं किंवा घरातल्यांचं आजारपण या अनेक कारणांमूळे नियमित व्यायामात अडथळे येतात. आणि एकदा का व्यायामात एक आठडा, पंधरा दिवस किंवा महिन्याभराचा मोठा ब्रेक झाला तर व्यायामाची आवड असणाऱ्यांनाही पुन्हा जोमानं व्यायामाला लागण्यात अडथळे येतात. पण तज्ज्ञ मोठ्या विरामानंतर नियमित व्यायामाकडे परतण्याचे सोपे मार्ग सांगतात. त्यामुळे व्यायामात मोठया कालखंडचा विराम गेला तरी व्यायाम नव्यानं नियमित सुरु करता येतो.

- आधी स्वत:ला सांगा आपल्याला आता व्यायाम सुरु करायला हवा. स्वत:साठी काही ध्येयं निश्चित करा. आपण जो व्यायाम प्रकार करता त्यात मला येत्या आठवड्यात अमूक तमूक वेळात एवढं लक्ष गाठायचं आहे असं ठरवा. सूर्यनमस्कार, योग, चालणं, पळणं, दोरीवरच्या उड्या किंवा कोणताही व्यायाम प्रकार असला तरी चालेलं. पण येत्या आठत आपल्याला काय आणि किती करायचं आहे हे मनाशी ठरवा. ते कागदावर लिहून काढा आणि रोज ते पाळण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायामाचा दिनक्रम जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत आठवड्याचा व्यायाम प्रकार आणि त्यातलं ध्येय ठरवून ते पाळण्याचा प्रयत्न करावा. फक्त तज्ज्ञ म्हणतात की सुरुवातीलाच अवघड ध्येय ठेवू नयेत. कारण ते जर पूर्ण झाले नाहीत तर व्यायाम नियमित होणं अशक्य आहे,

- स्वत:ला जबाबदार ठरवा. आपण आठवडभराच्या व्यायामाचं जे नियोजन केलं आहे ते आपण पाळतो आहोत ना हे बघण्याची आणि मोजण्याची जबाबदारी स्वत:चीच असते हे लक्षात असू द्या. हल्ली व्यायामाशी संबंधित अनेक वेअरेबल डिव्हाइसेस आहेत. हे डिव्हाइसेसही आपल्याला व्यायामास प्रोत्साहन देण्याचं काम करतात. आपल्याला आधीची उद्देशपूर्ती सांगून त्यापेक्षा जास्त करण्याचं ध्येय या डिव्हाइसेसमधूनही मिळू शकतं. व्यायामाच्या संबंधातली जबाबदारी आपलीच ही भूमिका निश्चित करुन व्यायाम करावा.

- कसंही करुन नियमित व्यायामाकडे वळणं हाच नियमित व्यायाम करण्याचा नियम आहे. व्यायाम करत नसतानाही आपण चांगलंच होतो, व्यायाम न करुन फारसा वाईट परिणाम आपल्यावर झालेला नाही असा विचार करणं आधी बंद करावा. अपलं व्यायामाचं वेळापत्रक कोलमडलं आहे आणि ते नियमित होणं गरजेचं आहे याचं महत्त्व स्वत:ला पटवून देता यायला हवं. जेव्हा महिना दोन महिने एवढा मोठा व्यायाम विराम असेल तर पून्हा नव्यानं सुरुवात करताना आधी जेवढं करत होतो त्याच्या ५० टक्के व्यायाम करुन सूरुवात करावी. आणि मग दर आठवड्याला १० ते १५ टक्के त्यात वाढ करावी. विरामानंतर पहिल्याच दिवशी आधीइतका १०० टक्के व्यायाम करायला गेल्यास स्नायुंना दूखापत होण्याची शक्यता असते. शिवाय अनेकांकडून व्यायामात वाढ एकदम होत नाही. तेव्हा पुन्हा व्यायामाच्या नियोजनात स्थिरावण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. आधी मी अमूक तमूक व्यायाम इतक्या वेळ करायचे/ करायचो आता होत नाही असं न म्हणता स्वत:च्या क्षमतेनुसार व्यायामात वाढ करावी.

- अनेक कारणांमुळे व्यायामाची पूर्वीची वेळ पाळणं शक्य होत नाही. पूर्वी ज्याप्रमाणे एक सलग वेळ देऊन विशिष्ट वेळेत व्यायाम व्हायचा तसं आता होत नसेल तर व्यायाम टाळण्यापेक्षा सरळ व्यायामाचे छोटे छोटे तुकडे करुन ,दिवसाच्या वेवेगळ्या वेळेत व्यायाम केला तरी चालतो. सलग ७-८ तास बैठं काम असतं. अशा वेळेस या कामात ब्रेक म्हणून पाच ते सात मिनिटं व्यायाम करावा. यामुळे सलग बसण्याचे दूष्परिणाम टाळता येतात आणि व्यायामाचं ध्येयं गाठता येतं. आपल्या व्यस्त दिनचर्येत व्यायाम कुठे बसवायचा हा प्रश्न असलेल्यांसाठी तुकड्या तुकड्यात व्यायाम हा उत्तम पर्याय ठरतो. ध्येय जर छोटे छोटे असतील तर ते पूर्ण करण्यास सुलभ असतात. त्याचा ताण येत नाही.तुकड्यात व्यायाम करताना मधल्या वेळेत व्यायामासाठी स्ट्रेचिंग आणि स्ट्रेन्थनिंगचे प्रकार करावेत.

- सोबतीनं व्यायाम हाही व्यायामात नियमितता येण्यातल्या मुख्य घटक आहे. घरातले सदस्य, मित्र मैत्रिणी यांच्यासोबत घराबाहेर पडून व्यायाम करण्याचं नियोजन करावं. किंवा कोणी सोबत नसलं तरी व्यायामात नव्यानं रस निर्माण होण्यासाठी घराबाहेर पडून बागेत, जॉगिंग ट्रॅकवर जाऊन व्यायाम करावा. अनेक अभ्यासातून हे सिध्द झालं आहे की बाहेर, निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन व्यायाम करणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम असतं. आठवड्यातले किमान १२० मिनिटं पर्यावरणाच्या सान्निध्यात व्यायाम करण्यामुळे आरोग्य सुधारतं. शिवाय नियमित व्यायामाची मानसिकता तयार होते.

- एका मोठ्या विरामानंतर व्यायाम करताना व्यायामासाठी स्वत:ला तयार करणं हेच मोठं आव्हान असतं. यासाठी तज्ज्ञ म्हणतात की स्वत:शी बोला- सकारात्मक बोला. अमूक व्यायाम मला अवघड जातो, मला जमतच नाही हे असं म्हणण्यापेक्षा अमूक एक प्रकार अवघड जात असला तरी मी रोज करुन पाहिन, अमूक केल्यानं मला किती छान वाटलं हे असं बोलून स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित करत राहाणं मोठ्या विरामानंतर व्यायामाच्या नियमित  सवयीत परतण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.