'कहो ना प्यार है', 'गदर' यासारख्या चित्रपटांमधून अमिषा पटेल जेवढी झपाट्याने चर्चेत आली होती, तेवढ्याच वेगात तिची चर्चा कमी झाली. कारण हळूहळू अमिषाचे चित्रपटांमधून दिसणेच कमी झाले. बॉलीवूडपासून दुर असली तरी अमिषा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा नेहमीच प्रयत्न करते. ती इन्स्टाग्राम, सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असून तिने नुकतेच तिच्या वर्कआऊटचे काही व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अमिषा वेट लिफ्टिंग वर्कआऊट करताना दिसत आहे.
अमिषाचे वर्कआऊट पाहून असे वाटते की तिने नक्कीच २० ते ३० किलोचे वेटलिफ्टिंग केले असणार. एरवी महिला, तरूणी खूप ओझे उचलताना दिसत नाही. घरात तर महिलांकडून ओझे उचलणे हमखास टाळले जाते. एकीकडे असे चित्र असताना, दुसरीकडे मात्र जिममध्ये जाऊन वेट लिफ्टिंग वर्कआऊट केले जाते. असे का? तरूणींनी, महिलांनी खरोखरंच करावं का असं वेटलिफ्टिंग? वेटलिफ्टिंग करण्याचे फायदे नेमके आहेत तरी कोणते? बऱ्याचदा असंही म्हंटलं जातं की महिलांनी वेटलिफ्टिंग करू नये, पण असं म्हणणं चुकीचं आहे. महिलांनी जर फिटनेस ट्रेनरचं योग्य मार्गदर्शन घेऊन व्यायाम केला तर ते आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
वेटलिफ्टिंग वर्कआऊटचे फायदे१. वेटलिफ्टिंग वर्कआऊट स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी अतिशय फायद्याचे मानले जाते. त्यामुळे ते पुरुषांसाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढीच त्याची गरज महिलांनाही आहे. २. वेटलॉससाठी हा व्यायामप्रकार उत्तम मानला जातो. कारण वेटलिफ्टिंगमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी, एक्स्ट्रा कॅलरी झपाट्याने बर्न होऊ लागते. त्यामुळे महिलांनीही हा व्यायाम नियमितपणे करावा.३. बॉडी टोन सुधारण्यासाठी वेट लिफ्टिंग हा एक उत्तम पर्याय आहे.४. वेट लिफ्टिंग करण्यासाठी खूप जास्त एकाग्रता लागते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे, एकाग्रता वाढविणे, यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी नियमितपणे वेटलिफ्टिंग वर्कआऊट करायला हवे.
५. स्नायू आणि हाडांना बळकटी मिळण्यासाठी हा व्यायामप्रकार केला पाहिजे.६. पाठ, मान, दंड, मांड्या, पाय, पोटऱ्या अशा शरीराच्या विविध भागांचा व्यायाम एकाचवेळी होण्यासाठी वेटलिफ्टिंग करण्याचा सल्ला दिला जातो. ७. नियमितपणे वेटलिफ्टिंग केल्यास रक्तातील साखरेची पातळी संतूलित राहते तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहतो, असे तज्ज्ञ सांगतात. ८. निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हा व्यायामप्रकार फायदेशीर ठरतो.
वेटलिफ्टिंग वर्कआऊट करण्यापूर्वी काळजी घ्या- वेटलिफ्टिंग वर्कआऊट हा एक अवघड व्यायाम प्रकार मानला जातो. कारण हा व्यायाम करताना दुखापत होण्याची शक्यता असते.- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वेटलिफ्टिंग व्यायाम केला पाहिजे.- मनानेच कोणतेही वजन उचलू नये.- आपली प्रकृती, फिटनेस, स्ट्रेन्थ या सगळ्या गोष्टी फिटनेस ट्रेनरकडून तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसारच वेटलिफ्टिंग करावे.