वृषाली जोशी -ढोके
बेहता है मन कहीं, कहाँ जानते नहीं कोई रोक ले यहीं
भागे रे मन कहीं, आगे रे मन चला जाने किधर जानु ना
अगदी खरंय.. असे हे चंचल मन आपल्याला शांत बसू देत नाही, म्हणजे कितीही मन लावून गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरीही मनात विचार असतात वेगळे आणि कृती करत असतो वेगळी. सतत कशा मागे तरी धावणे, विचार करणे यामुळे आपल्या आयुष्यातील मनःशांती आपण गमावून बसलो आहे त्यामुळे शांत झोप येत नाही. या सगळ्यांमुळे आपली निर्णय क्षमता पण कुठे तरी कमी होत चालली आहे. आजकाल मनोकायिक व्याधींमुळे अर्थात सायको सोमॅटिक आजारांमुळेही आपण त्रस्त आहोत. मग डॉक्टर सांगतात योगाभ्यास सुरू करा, ध्यान करा, प्राणायाम करा. परंतु ध्यान कसे करायचे ते कुठून सुरू होते याची पूर्व तयारी न करता आपण ध्यानाला बसतो आणि मग हेच चंचल मन ध्यान सुद्धा नीट होऊ देत नाही.
ध्यान करताना शरीराने आपण एकाजागी बसतो पण मन त्यावेळेत अनेक ठिकाणी फेरफटका मारून आलेले असते. मनावर नियंत्रण आणयाचे तर त्या साठी श्वासावर नियंत्रण आणयला हवे. पतंजली महामुनिनी अष्टांग योग सांगितला आहे. त्याचे दोन प्रकार पण सांगितले आहे. बहिरंग योग आणि अंतरंग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम हा बहिरंग योग आहे तर धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग आहे.
बहिरंग योग हा सहज शिकवता येतो परंतु अंतरंग योग हा आपण स्वतः अनुभवायचा असतो.
प्रत्याहार ही अशी पायरी आहे जी बहिरंग योगाकडून अंतरंग योगाकडे नेते.
१. म्हणजेच काय आपल्या पाच ज्ञानेंद्रिये आणि मनावर ताबा मिळवणे जेणे करून सहजतेने धारणा करून ध्यान करता येईल.
२. आपल्या अंतरंगात आपण शुद्ध आणि शांत मनाने डोकावून बघू शकलो तर सहजच आपले ध्यान लागेल आणि मानवी जीवनाच्या अंतिम पायरीकडे म्हणजेच समाधीकडे सहज पोहोचता येईल.
३. प्रत्येक ज्ञानेंद्रियांची ओढ ही बाहेरच्या जगात जे अनेक विषय आहेत त्याकडे असते. त्या सर्व विषयातून मनाला अंतर्मुख करणे म्हणजेच अंतरंग योग.
४. अंतर्मुख होणे लगेच शक्य होणार नाही परंतु त्या साठी आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करणे जास्त फायदेशीर ठरणार आहे. जसे जसे श्वासावर आपण नियंत्रण आणू तास तसे आपले मन शांत होणार आहे आणि मन शांत आले की आपोआप ध्यान धारणा करणे सहज शक्य होणार आहे.
५. प्राणायामासोबत ओंकार जप सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. योगाभ्यास करताना त्या मागची आध्यात्मिक बैठक लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. फक्त शारीरिक व्याधी दूर करून निरोगी राहणे हे एक उद्दिष्ट लक्षात न ठेवता योगाभ्यासाने समाधी पर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवायचे आहे.
६. बहिरंग योग जितका महत्त्वाचा आहे तितकाच अंतरंग योग महत्त्वाचा आहे जो आपल्याला अंतर्मुख करून स्वतःला शोधायला मदत करतो.
(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)