व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी तर चांगला असतोच पण फिगर चांगली राहण्यासाठी आणि फ्रेश मूडसाठीही व्यायाम अतिशय गरजेचा असतो. बॉलिवूड सेलिब्रीटी नियमाने व्यायाम करत असल्याचे आपण नेहमी पाहतो. त्यामुळे त्यांची तब्येत तर चांगली राहतेच पण फिटनेसही चांगला राहण्यास मदत होते. जान्हवी कपूरला वर्कआऊट करायला खूप आवडते त्यामुळे ती सुट्टीच्या दिवशीही व्यायामाला दांडी न मारता काही खास व्यायामप्रकार करते. आपल्या फिटनेस रुटीनमध्ये खंड पडू नये यासाठी ती नेहमी काही ना काही करताना दिसते.
नम्रता पुरोहित या जान्हवी कपूरची फिटनेस ट्रेनर असून जान्हवी कोणते व्यायामप्रकार करते याविषयी त्या माहिती देतात. व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी माहिती दिली. जान्हवी योगा, फंक्शनल ट्रेनिंग आणि इतर कार्डिओव्हस्क्युलर व्यायाम करते. सुटीच्या दिवशी नेमका कोणता व्यायामप्रकार करायचा हे ठरलेले नसते. पण ऐनवेळी व्यायामासाठी जे सामान उपलब्ध असेल आणि जे करावेसे वाटेल ते आम्ही करतो. या व्यायामांचे नेमके असे काही रुटीन ठरलेले नसून आम्हाला वाटेल तो वर्कआऊट आम्ही करतो. यामध्ये हिप लिफ्ट, बटरफ्लाय हिप लिफ्ट्स, सुमो स्क्वाटस, प्लॅंक, साईड प्लँक असे प्रकार असतात. हे व्यायाम कसे करायचे पाहूया.
१. हिप रेज
- पाठीवर झोपा
- पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही पाऊले पृष्ठभागाच्या बाजूला ठेवा.
- आता पावलांवर भार देऊन कंबरेतून वर उठा.
- खांदे, पृष्ठभाग आणि गुडघे एका सरळ रेषेत राहतील याची काळजी घ्या.
- या पोझिशनमध्ये ४ ते ५ सेकंदांसाठी थांबा त्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीत येऊन पुन्हा हेच आसन करा.
२. बटरफ्लाय हिप रेज
- पोटावर झोपा.
- हाताची बोटे कपाळाच्या खाली ठेवा.
- दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जोडा आणि पाठ न उचलता मांडी जमिनीपासून काही सेंटीमीटर वर करा.
- ही पोझिशन ५ ते १० सेकंदांपर्यंत ठेवा आणि पुन्हा पूर्वीच्या स्थितीत जा.
३. अॅबचा व्यायाम करताना
- पाठीवर झोपा आणि पाय गुडघ्यात वाकवून कंबरेच्या बाजूला ठेवा.
- हात डोक्याखाली किंवा बाजूला ठेवा.
- पोटाचा भाग घट्ट करुन श्वास बाहेर सोडून चेहरा छातीच्या दिशेने आणा.
- मागे येत असताना मोठा श्वास घ्या.
- यामध्ये तुम्ही केवळ चेहरा आणि छातीचा भाग उचलत आहात इतकेच लक्षात घ्या, पोटाच्या खालचा भाग उचलला जाणार नाही याची काळजी घ्या.