गेल्या दिड वर्षात कोरोना, लॉकडाऊन यामुळे एकूणच जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या सुविधेमुळे तासनतास घरात एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागली आहे. मनोरंजनाच्या बाबतीत ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सलग वेबसीरीज बघण्याचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळेही बैठक वाढली आहे. व्यायामाचं एकूणच प्रमाण कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत खूपच कमी झालं आहे. ही बदललेली जीवनशैली एका बाजूनं आकर्षक वाटत असली , सोयीची वाटत असली तरी या जीवनशैलीमुळे एका जागी बैठकीचं वाढलेलं प्रमाण हे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. या अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे स्त्री पुरुषांमधे विशेषत: स्त्रियांमधे कर्करोगाचं प्रमाण दिसून येत असल्याचं आणि त्यात वाढ होण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे. त्यामुळे अभ्यासकांनी या धोक्याबाबत संपूर्ण जगाला अवगत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अभ्यासक आपल्या अभ्यासाद्वारे केवळ धोक्याचा इशाराच देतात असं नाही तर कर्करोग आणि इतर गंभीर समस्यांचा धोका टाळण्याचा मार्ग देखील सांगत आहे. अभ्यासक सांगत असलेला मार्ग अवघड नसून तो केवळ रोज 45 मिनिटांचा असून आठवडयाला पाच तास इतकाच आहे. या वेळेत काय केलं म्हणजे कॅन्सरचा धोका टळेल असं तज्ज्ञ सांगतात? तर याचं सोपं उतर आहे व्यायाम.
Image: Google
अभ्यास काय सांगतो?
नियमित व्यायाम करा, यामुळे आरोग्य सुधारतं, आरोग्य विषयक समस्यांचा धोका टळतो हे शास्त्रज्ञ सांगत असले, व्यायाम, व्यायामाचे फायदे किती छान आहेत हे ऐकायला बरं वाटतं. पण एकूणच कोरोना आणि लॉकडाऊनने वेगवेगळ्या कारणांमुळे एका जागेवर तीन चार तास बसण्याची सवय लागते आहे. ही सवय जर बदलली नाही तर कर्करोगाचा धोका न टाळता येणारा असेल असा इशारा अभ्यासक देतात. शरीर निष्क्रिय राहिल्यास भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. हा अभ्यास अमेरिकन अभ्यासकांनी केला असून त्याबद्दलचे निष्कर्ष ‘ मेडिसिन अँण्ड सायन्स इन स्पोर्टस अँण्ड एक्सरसाइज यात प्रसिध्द झालेले आहेत. शारीरिक निष्क्रियतेचा आरोग्यावर कसा घातक परिणाम होतो यासाठी अभ्यासकांनी 2013 ते 2016 अमेरिकेतील कर्करोग रुग्णांच्या केसेसचा अभ्यास केला . तेव्हा त्यांना आढळलं की कर्करोगाच्या सर्व केसेसपैकी 3 टक्के रुग्णांमधे कर्करोगाचं कारण त्यांच्या शारीरिक निष्क्रियतेशी निगडित आहे. कोरोनानं या निष्क्रियतेत आणखीनच वाढ केल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता कर्करोगाचा धोका वाढलेला आहे . अमेरिकेत 30 वर्ष आणि त्यावरील लोकांमधे कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांमधे हे प्रमाण जास्त आढळून आलं आहे.
या अभ्यासाद्वारे निष्कर्ष म्हणून आलेल्या आकड्यांचं तज्ज्ञांनी विश्लेषण केलं आहे. ही आकडेवारी सांगते, की अमेरिकेत 16.9 टक्के पोटाचा कॅन्सर, 11.9 टक्के एंडोमेट्रियल कॅन्सर, 11 टक्के आतड्यांचा कॅन्सर, 9.3 टक्के कोलन कॅन्सर, 8.1 टक्के अन्ननलिकेचा कॅन्सर तर 6.5 टक्के महिलांना स्तनांचा कॅन्सर झाल्याचं आढळून आलं . या सर्व प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच 3.9 टक्के मूत्राशयाच्या कॅन्सरचं प्रमाणही आहे. अभ्यासक म्हणतात या कर्करोगाचा संबंध बैठ्या जीवनशैलीशी आहे.
अमेरिकन अभ्यासकांनी या निष्कर्षावरुन एक धोका वर्तवला आहे की कोरोना नंतरच्या काळात बैठ्या जीवनशैलीमुळे होणार्या कर्करोगाचं प्रमाण वाढणार आहे.
Image: Google
धोका टाळता येऊ शकतो.
अभ्यासक केवळ धोक्याचा इशारा देऊन थांबत नाही. तर आपण ही जोखीम टाळू शकतो हे सांगत त्यावरचा मार्गही दाखवतात. अभ्यासक म्हणतात की आठवडाभरात पाच तासांचा मध्यम आणि तीव्र गतीचा व्यायाम कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहे. दररोज 45 मिनिटं मन लावून केलेला व्यायाम आपल्याला सुदृढ आरोग्य तर देतंच, पण आनंदी मनही देतं. भविष्यातील आरोग्याला असलेले धोके कमी करतं. अभ्यासकांना याचीही जाणीव आहे की व्यायाम हा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी उपयुक्त असला तरी व्यायामासाठी वेळ काढण्यात अनंत अडचणीही सध्या उभ्या आहेत. वाढलेले कामाचे तास, आपल्या सोयिस्कर वेळेत बाहेर जाऊन व्यायाम करण्यासाठीच्या पुरेशा सुरक्षेचा अभाव ही कारणं विशेषत: महिलांच्या व्यायामाच्या दिनचर्येत किंवा निश्चयात खोडा घालतात.
Image: Google
अभ्यासक म्हणतात की, महिलांनी कामाचं नियोजन करुन एक ‘मी टाइम’ म्हणून व्यायाम करावा. मी टाइमसाठी झगडून महिला वेळ काढतील, व्यायाम करतील त्याचा त्यांना शरीराला तर फायदा मिळेलच पण सोबतच मनस्वास्थ्य उत्तम होण्यासही उपयोग होईल. घरातल्या घरात दोरीवरच्या उड्या मारणं, स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं हे देखील व्यायामाचे उत्तम पर्याय आहेत. जमेल तेव्हा पायी चालणं, जिने चढणं, उतरणं यासारख्या क्रियांनी शरीर सक्रीय राहील. अभ्यासक म्हणतात शरीराची ही सक्रीयताच कर्करोगाचा धोका टाळेल हे नक्की