बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या शरीरात मेद आणि चरबी वाढत जाते. अनेकदा पोट, कंबर या भागांतील चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. वाढलेले पोट चांगले तर दिसत नाहीच पण आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसते. एकदा पोटावर चरबी जमा व्हायला लागली की ती काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. मग आपण व्यायाम करतो, कधी काही बेल्ट वापरतो तर कधी डाएट करतो. पण ही जमा झालेली चरबी कमी व्हायला बराच वेळ लागतो. पोट कधी कधी इतके वाढते की ते खालच्या बाजुने लोंबायला लागते. असे पोट असाणाऱ्यांसाठी प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव काही खास योगासने सांगतात. झटपट होणारी आणि कोणीही करु शकेल अशी ही आसने केल्यास पोट कमी होण्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. मात्र चांगले रिझल्ट हवे असतील तर कोणताही व्यायाम करताना नियमितता हवी हे तितकेच खरे (Baba Ramdev Suggest 3 Easy Yoga Asanas to get Rid of Belly Fat).
१. तिरकस ताडासन
आपल्याला ताडासन माहित असते, पण तिरकस ताडासन हाही एक उत्तम व्य़ायामप्रकार आहे. यामध्य़े दोन्ही हात वर ताणून कंबरेतून दोन्ही बाजूंना वाकायचे. त्यामुळे पोटाच्या स्नायूंना ताण पडतो आणि पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून तीन ते ४ वेळा हा व्यायामप्रकार आपण अगदी कुठेही उभे राहून सहज करु शकतो. यामुळे पोटाच्या भागात वाढलेली चरबी तर कमी होईलच पण शरीर फ्लेक्सिबल होण्यासही याची मदत होईल.
२. शलभासन
शलभासन हे संपूर्ण शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आसन आहे. या आसनामुळे हात, पाय, मांड्या, कंबर तसेच पोटाचा चांगला व्यायाम होतो. पोटाचे आजार दूर करण्यासाठी हे एक उत्तम आसन असून नियमितपणे केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी करण्याबरोबरच पाठीच्या कण्यासाठीही या आसनाचा चांगला उपयोग होतो.
३. कुंभकासन
दोन्ही हाताचे तळवे आणि पायाचे चौडे यांच्यावर शरीराचा तोल सांभाळणे म्हणजे कुंभकासन. या आसनामध्ये कोअर म्हणजे पोटावर ताण येत असल्याने पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन नियमीतपणे केल्यास वजन तर कमी होतेच पण पाठीचे दुखणे कमी होण्यासही याची चांगली मदत होते. शरीराचा बॅलन्स आणि फ्लेक्सिबिलीटी कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.