नको वाटतं ग, थोडंसं चाललं तरी ते दम लागतो. जिने चढउतार केली की धाप लागते, कधी काम जास्त पडलं, तर अंग दुखायला लागतं. रात्री झोपलं की पाय दुखतात, बॉडी पेन तर नेहमीचंच. या अशा तक्रारी आपण कायम ऐकतो, करतोही. हे का होतं असं? त्याचं उत्तर एकच, एनर्जी कमी पडते म्हणून! त्यात दिवस थंडीचे असले, तर आणखीच ऊर्जा लागते. ती आपल्याला खाण्यातून तर मिळवावी लागतेच, पण व्यायामही करावा लागतो. शरीर ऊबदार राहण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योगासनांचा चांगला वापर होतो. ऐन हिवाळ्यात तब्येतीकडे लक्ष द्या, भरपूर एनर्जी मिळवा, फिट व्हा. त्यासाठी सुरुवात करायची म्हणून ही २ आसनं..
१. नौकासन
फुप्फुसे, श्वसनसंस्था आणि आतड्यांना मजबूत करण्याचं काम नौकासनाद्वारे केलं जातं. थंडीच्या दिवसांत सगळ्यात जास्त बाधित होते ती श्वसनसंस्था. म्हणूनच नियमितपणे नौकासन करा. नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता ३० डिग्री अंशावर उचला. यानंतर दोन्ही हात समोरच्या दिशेने ठेवून हात आणि मान उचला. या आसनात तुमच्या शरीराचा आकार एखाद्या नौकेप्रमाणे म्हणजेच जहाजाप्रमाणे होतो. नौकासन केल्यानंतर कमीत कमी ३० सेकंद तरी आसनस्थिती ठेवावी.
२. सेतुबंधासन
हे आसन नियमितपणे केल्यास पचनक्रिया सुधारते. तसेच हिवाळ्यात अनेक जणींना पाठ आणि कंबरदुखी खूप जास्त प्रमाणात जाणवू लागते. या आसनामुळे पाठ आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. हे आसन केल्यानंतर शरीराचा आकार एखाद्या पुलाप्रमाणे दिसतो म्हणून याला सेतुबंधासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवा. त्यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. आता केवळ डोके आणि मान जमिनीवर टेकलेली असू द्या आणि संपूर्ण शरीर वर उचला. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा.