Join us  

पाठदुखी-मानदुखीने छळले आहे? रोज करा ३ आसनं, दुखण्याच्या चक्रातून बाहेर पडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 4:18 PM

त्रिकोणासन, कटीचक्रासन, मार्जारासन ही ३ आसनं रोज करा, पाठदुखी-मानदुखीसाठी रोज उत्तम व्यायाम . trikonasana- marjariasana -katichakrasana - yoga for good health.

ठळक मुद्देसगळीच आसनं तज्ज्ञ योग शिक्षकांकडून शिकून घेणे महत्त्वाचे आहे.

वृषाली जोशी-ढोके

गेल्यावर्षी जसे लॉकडाऊन सुरू झाले तसे ऑफिसचे काम असो की मुलांची शाळा सगळेच जण तासनतास लॅपटॉप, मोबाईल, टॅब अश्या साधनांसमोर बसून आहेत. वर्क फ्रॉम होममुळे दिवस रात्र फक्त काम आणि काम. बाहेर कुठे जाता येत नाही मग काम संपले तरी टीव्ही आणि मोबाईलच आपले मित्र. या सगळ्या चक्रात मनःशांती तर गमावली आहेच परंतु पाठदुखी, मानदुखी यासारखे गंभीर आजारही छळायला लागले आहेत. दुसरीकडे घरात स्त्रियांवर पण कामाचा भरपूर ताण आल्यामुळे कंबरदुखी, टाचदुखी सारखे आजार सुरू झाले आहेत. काम करत असतो तेव्हा या गोष्टींकडे लक्ष जात नाही परंतु अचानक काम करता करता वेदना जाणवू लागल्या की हात पाठीकडे जातो. एखादी वस्तू खाली वाकून उचलताना लक्षात येते की पाठदुखी, कंबरदुखी सुरू झाली आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर बऱ्याच जणांची मान अखडलेली असते. या सगळ्याची काही सर्वसामान्य कारणं आहेत जसे की बरेच तास उभे राहून किंवा एकाच जागी बसून काम करणे,चुकीच्या पद्धतीने उभे राहणे किंवा बसणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा असे काही. त्रास जाणवतो म्हणजेच आपले शरीर आपल्याला वारंवार सूचना देत असते पण आपण त्याकडेही दुर्लक्ष करून आपले रूटीन चालूच ठेवतो. रोज आपल्या रूटीन मधून ५ ते १० मिनिट काढून काही सोप्प्या आसनांचा अभ्यास केला तर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. पाठीचा कमरेचा आणि मानेचे स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे जसे की पुढे आणि मागे वाकणे, कमरेचे चक्र, मानेचे चक्र, दत्त मुद्रा. स्ट्रेचिंग मुळे स्नायू मोकळे होतात आणि ताण कमी होतो. त्यानंतर खालील काही आसनांचा अभ्यास केला तर विशेष परिणाम जाणवेल. (trikonasana- marjariasana -katichakrasana)

(Image : Google)

१. कटीचक्रासन - दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेवून डाव्या आणि उजव्या बाजूला कमरेतून वळणे. यामुळे पाठीला चांगलाच पीळ पडतो आणि पाठीची कार्यक्षमता वाढते.

(Image : Google)

२. त्रिकोणासन - यामध्ये शरीराची त्रिकोणासारखी आकृती दिसते. या आसनामध्ये शरीराला एकाच दिशेने ताण मिळतो आणि पाठ,कमर, गुडघे, ओटीपोट यांची कार्यक्षमता सुधारते.

(Image : Google)

३. मार्जारासन - या मध्ये मांजरी प्रमाणे गुडघ्यांवर बसून हात आणि गुडघे एका रेषेत ठेवावे आणि पाठीला खालच्या आणि वरच्या दिशेने ताण द्यावा. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो तसेच मानेची कार्यक्षमता सुधारते.

ही आसनं करताना काय काळजी घेणार?

१. ज्यांचा पाठीचा कणा ताठरलेला आहे त्यांनी अतिशय संथ सावकाश हालचाली करणे गरजेचे आहे. तसेच शरीराला झेपेल तितपत ताण घ्यायचा आहे.२. ज्यांना स्लीप डिस्क, मणक्या मध्ये गॅप, आथरायटीससारखे गंभीर आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आसनांचा अभ्यास करावा.३. गर्भवती महिलांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा कारण पाठदुखी ही कोणत्या कारणाने झाली आहे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.४. सगळीच आसनं तज्ज्ञ योग शिक्षकांकडून शिकून घेणे महत्त्वाचे आहे. त्यातून भविष्यात होणारे गंभीर आजार आपण सहजतेने टाळू शकू.

(लेखिका आयुष प्रमाणित योगा-वेलनेस ट्रेनर आहेत.)

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेआरोग्यफिटनेस टिप्स