Join us  

आहारात कडधान्ये असायलाच हवीत, तज्ज्ञ सांगतात त्याची ४ महत्त्वाची कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 3:48 PM

Benefits of Beans in Diet : हृदयाच्या आरोग्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत कडधान्ये पोषक ठरतात.

आपला आहार परीपूर्ण असेल तरच आपलं आरोग्य उत्तम राहतं. शरीराचे पोषण झाले तर शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत राहतात. मात्र योग्य रितीने पोषण झाले नाही तर आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात आणि प्रतिकारशक्तीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच आहारात धान्ये, डाळी, भाज्या, पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे, कडधान्ये अशा सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा असे आपण वारंवार ऐकतो. पण यातील प्रत्येक घटकांत आरोग्याला उपयुक्त असणारे कोणते घटक असतात याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही (Benefits of Beans in Diet). 

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सातत्याने काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच त्यांना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी कडधान्यांचे आपल्या आहारातील महत्त्व आणि कडधान्ये खाण्याचे फायदे समजून सांगितले आहेत. भारतात विविध रंगांची, आकाराची आणि चवीची ही कडधान्ये आपण आवर्जून आहारात घ्यायला हवीत. हृदयाच्या आरोग्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत कडधान्ये पोषक ठरतात. म्हणूनच नैसर्गिकरित्या फॅट-मुक्त आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेली कडधान्ये आहारात आवर्जून घ्यायला हवीत. उत्तम आरोग्यासाठी आहारात दररोज किमान १ कप कडधान्यांचा समावेश करायला हवा.

(Image : Google)

फायदे 

१. कडधान्यांमध्ये अँटीऑक्सिडंटस, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी आणि विविध आजारांचा सामना करण्यासाठी कडधान्ये फायदेशीर ठरतात.

२. कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तसेच त्यातून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते. यामध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त असते. तसचे कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदो होतो. 

३. कडधान्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कडधान्यामुळे कर्करोग नियंत्रणात राहण्यास मदत होते. कडधान्यामध्ये असणारे घटक हे कर्करोग नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असतात, त्यामुळेही कडधान्ये खायला हवीत. 

४. शाकाहार घेणाऱ्या लोकांमध्ये प्रोटीन म्हणजेच प्रथिनांचे प्रमाण कमी असते. मात्र रोजच्या आहारात कडधान्ये घेतल्यास प्रोटीनची कमतरता भरुन निघण्यास मदत होते. कडधान्याची उसळ भातासोबत खाल्ल्यास परीपूर्ण असा प्रोटीनयुक्त आहार होतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्स