फॅशन डिझायनर म्हणून चित्रपटसृष्टीत आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये मसाबा गुप्ता ओळखली जाते. फिट ॲण्ड फॅशनेबल ही तिची आणखी एक ओळख. ती स्वत: डिझाइन केलेल्या आउटफिटबाबत जशा पोस्ट टाकते तशाच व्यायाम प्रकार, त्याचे फायदे याबद्दलही पोस्ट, स्टोरीज इन्स्टासारख्या समाजमाध्यमावर टाकत असते. मसाबा गुप्तानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक फोटो स्टोरी शेअर केली आहे. या फोटोत मसाबा गुप्ता मेडिसिन बाॅलने व्यायाम करताना दिसते. बाॅडी टोन ठेवण्यासाठी , कोअर मसल्सचा ( छाती, पोट स्नायू) फिटनेस वाढवण्यासाठी मेडिसिन बाॅलचा व्यायाम फायदेशीर ठरतो.
Image: Google
बाॅडी टोन करण्यासाठी फिटनेस बाॅलचा उपयोग होतो. मसाबा म्हणते मेडिसिन बाॅलने हसत खेळत वजन कमी करता येतं. फिटनेस वाढवता येतो. मेडिसिन बाॅल फेकायचा, झेलायचा आणि व्यायाम करायचा. फेकलेला बाॅल प्रसाद जसा घेताना आपण खाली सांडू देत नाही त्याप्रमाणे काळजीनं, खाली न पडू देता झेलावा असं मसाबा म्हणते. या फोटोला कॅप्शनच तिने 'काॅट दॅट वन लाइक प्रसाद का लड्डू -फिनिश्ड टुडे' अशी दिली आहे.
मसाबा गुप्ताची इन्स्टाग्रामवर टाकलेली फोटो स्टोरी व्हायरल झाल्यानंतर फिटनेस ट्रेनर समीरा चेटिया यांनी मेडिसिन बाॅलचा मसाबा करत असलेला व्यायाम प्रकार , मेडिसिन बाॅलने व्यायाम करण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत.
Image: Google
बाॅल फेकणं आणि झेलणं याला वाॅल बाॅल व्यायाम असं म्हणतात. मेडिसिन बाॅलनं केवळ वाॅल बाॅल एवढा एकच प्रकारचा व्यायाम केला जात नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम मेडिसिन बाॅलद्वारे केले जातात.
Image: Google
मसाबा गुप्तासारखा मेडिसिन बाॅलने वाॅल बाॅल व्यायाम केला तरी पोट, पाठ, खांदे, दंड, हात, मांड्या, पोटऱ्या या अवयवांच्या स्नायुचा व्यायाम होतो. हा व्यायाम करण्यासाठी समीरा सांगतात त्याप्रमाणे मेडिसिन बाॅल छातीसमोर धरुन ताठ उभं राहावं. हातातील बाॅल भिंतीच्या दिशेने फेकावा. भिंतीवर आदळून येणारा बाॅल झेलावा. हातातला बाॅल दोन्ही हातांनी डोक्याच्या वर न्यावा, डोक्याच्या मागे न्यावा. पुन्हा पूर्वस्थितीत येऊन बाॅल भिंतीवर फेकावा आणि झेलावा. असं 20 वेळा 1 सेट याप्रमाणे 3 सेट करावेत. आपला पूर्ण व्यायाम मेडिसिन बाॅलला मध्यवर्ती करुन केला तरी देखील संपूर्ण शरीराचा उत्तम आणि सर्वांगिण व्यायाम होतो असं फिटनेस तज्ज्ञ समीरा म्हणतात.
मेडिसिन बाॅलने व्यायाम करण्याचे फायदे
1. समीरा म्हणतात, वाॅल बाॅल हा मेडिसिन बाॅलचा उपयोग करुन केल जाणारा पाॅवरफुल व्यायाम प्रकार आहे. शरीराच्या वरच्या भागाला या व्यायामानं ताकद मिळते.
2. मेडिसिन बाॅलचा वापर करुन व्यायाम केल्यानं शरीराची गती , शरीराच्या क्रिया-प्रतिक्रिया यावर चांगला परिणाम होतो. ताकद वाढते.
3. एक महिना मेडिसिन बाॅलने व्यायाम केला तर परिणामकारपणे वजन कमी करता येतं. मेडिसिन बाॅलद्वारे व्यायाम करुन वजन घटवण्यासाठी किमान 45 मिनिटं बाॅलचा वापर करत व्यायाम करायला हवा.
4. बाॅडी टोन करण्यासाठी मेडिसिन बाॅलने व्यायाम केल्यास फयदा होतो.