योगासने हा एक उत्तम व्यायामप्रकार असून नियमितपणे योगासने केल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. योगासने हा शरीराबरोबरच मनासाठीही उत्तम व्यायाम असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात योगासनांचा आवर्जून समावेश करायला हवा. सर्वांगासन हे एक महत्त्वाचे आसन असून आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर असते. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी फिटनेसबाबत नेहमी काही ना काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. अभिनेत्री आलिया भट आणि करीना कपूर यांच्या पर्सनल ट्रेनर असल्याने त्याही अंशुकासोबतच्या काही गोष्टी शेअर करत असतात. आताही अंशुका यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्वांगासन करण्याचे फायदे समजावून सांगितले असून ते कोणते, पाहूया (Benefits of Shoulder Stand Sarvangasana)...
कसे करायचे आसन?
१. सुरुवातीला पाठीवर झोपायचे.
२. पाय कंबर आणि पाठीतून वर घ्यायचे आणि शरीराचा सगळा भार खांद्यांवर घेण्याचा प्रयत्न करायचा.
३. दोन्ही हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले ठेवून हातांनी कंबरेला आधार द्यायचा
४. पाठ, पाय आणि कंबर जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न करायचा.
५. सुरुवातीला हे आसन काही सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू वेळ वाढवत न्यायची.
६. सुरुवातीला हे आसन तज्ज्ञांच्या मदतीने आणि एक एक स्टेप करत करायला हवे, हळूहळू जमेल.
सर्वांगासनाचे फायदे
१. मान आणि खांद्याला चांगले स्ट्रेचिंग मिळण्यास याची मदत होते.
२. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत होण्यासाठी सर्वांगासन करणे फायदेशीर असते.
३. पायांमधील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास सर्वांगासनाचा चांगला उपयोग होतो.
४. रक्ताभिसरण क्रिया सुरळीत करण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
५. शरीराच्या वरच्या भागासाठी आवश्यक असणारी ताकद खांद्यांमध्ये असावी लागते. सर्वांगासनामुळे ही ताकद वाढण्यास मदत होते.
६. मान आणि खांद्यांबरोबरच पाठ आणि पायाच्या स्नायुंची ताकद वाढण्यास सर्वांगासनाचा चांगला उपयोग होतो.