Join us  

Benefits of Squats : व्यायामाला वेळ नाही उठाबशा काढा! शिक्षा म्हणून नाही, आनंदाने करा एकच गोष्ट.. बघा फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 5:38 PM

Benefits of Squats : दिवसभरात १० ते १५ मिनीटे उठाबशा काढण्यासाठी काढली तर त्याचे नक्कीच फायदे होतात.

ठळक मुद्देतुम्हालाही इतर व्यायामाला वेळ मिळत नसेल तर न विसरता रोज ५० नाहीतर १०० उठाबशा काढायला विसरु नका. स्नायू बळकट होण्यापासून ते शरीरातील ताकद वाढण्यापर्यंत अनेक फायदे

लहानपणी शाळेत शिक्षा म्हणून काढलेल्या उठाबशा आठवतात? त्यानंतर दोन ते तीन दिवस पायात आलेले गोळे आठवले तरी नको वाटतं. पण ही शिक्षा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते असं आपल्याला कोणी म्हटलं तर खोटं वाटेल. इंग्रजीमध्ये ज्याला स्क्वाटस (Benefits of Squats) या नावानी ओलखळे जाते. लहानपणी शिक्षा म्हणून काढलेल्या याच उठाबशा आपण नियमित काढल्या तर व्यायाम म्हणून त्याचे आरोग्याला बरेच फायदे होतात. आपल्याला रोज व्यायामाला वेळ होत नाही अशी तक्रार आपल्यातील अनेक जण करतात. पण आपण इतर गोष्टींसाठी ज्याप्रमाणे वेळ काढतो त्याचप्रमाणे १० ते १५ मिनीटे उठाबशा काढण्यासाठी काढली तर त्याचे नक्कीच फायदे होतात. पाहूया उठाबशा काढण्याचे फायदे...

(Image : Google)

१. स्नायू बळकट व्हायला मदत 

उठाबशा काढा असं आपल्याला कोणी सांगितलं तर आपण त्याकडे कदाचित दुर्लक्ष करु. पण प्रत्यक्ष करायला सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट दिसले की आपल्याला त्यामागचे महत्त्व पटू शकेल. इतर कोणतेही व्यायाम केल्यावर पाय जितके मजबूत होणार नाहीत तितके उठाबशा काढल्याने होतात. याबरोबरच मांड्या आणि पोटऱ्याच्या स्नायूंना चांगला व्यायाम होत असल्याने नियमीत उठाबशा काढायला हव्यात. 

२. पायाचा व्यायाम म्हणजे संपूर्ण शरीराचा व्यायाम

उठाबशा म्हणजे केवळ शरीराच्या खालच्या भागाचा व्यायाम असे आपल्याला वाटते. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उठाबशांमध्ये पोट, पाठ, कंबर अशा सगळ्याच अवयवांचा व्यायाम होतो. त्यामुळे एकाच गोष्टीत सगळ्या शरीराचा व्यायाम होणाऱ्या उठाबशा अतिशय उपयुक्त असतात. 

३. शरीरयष्टी सुधारण्यास मदत

उठाबशांमध्ये शरीराच्या बहुतांश स्नायूंना ताण पडतो. त्यामुळे आपल्या नकळत आपली शरीरयष्टी सुधारण्यास या व्यायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो. शरीर वर खाली घेत असताना तुमचे शरीरावर नियंत्रण असणे आवश्यक असते. त्यामुळे आपोआप तुमचे पोश्चर सुधारते. 

(Image : Google)

४. ताकद वाढण्यास उपयुक्त 

उठाबशांमुळे पायातील, पाठ आणि कंबरेतील ताकद वाढते. त्यामुळे आपण जास्त वेळ फ्रेश राहतो आणि आपण आपला इतर व्यायाम किंवा दिवसभराच्या अॅक्टीव्हिटी अधिक जोमाने करु शकतो. पायातली ताकद वाढल्याने आपल्याला लवकर थकवा येत नाही. त्यामुळे तुम्हालाही इतर व्यायामाला वेळ मिळत नसेल तर न विसरता रोज ५० नाहीतर १०० उठाबशा काढायला विसरु नका. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स