दिवसभरात आपल्याला व्यायामाला वेळ होत नाही अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. घरातल्या जबाबदाऱ्या, ऑफीसची कामे, प्रवास यांतून आपण व्यायामासाठी पुरेसा वेळ काढू शकत नाही. पण कालांतराने आपण व्यायाम करत नसल्याचे परिणाम म्हणजे पाठदुखी, अंगदुखी किंवा इतर तक्रारी सुरू होतात आणि आपल्याला व्यायामाचे महत्त्व कळायला लागते. मात्र अशावेळी बराच उशीर झालेला असतो. असे होण्यापेक्षा रोजच्या रोज काही ठराविक स्ट्रेचिंग केल्यास त्याचा आरोग्याला चांगला उपयोग होतो. शरीरातील प्रत्येक मसलसाठी ठराविक व्यायाम करणे आवश्यक असते. कमी वेळात संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग करायचे असेल तर सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याशिवाय इतरही स्ट्रेचिंगचे वेगवगेळे व्यायाम आपण करु शकतो. वय वाढलं की आपलं शरीर आखडल्यासारखे होते, हा आखडलेपणा दूर करण्यासाठी स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम उपाय आहे. पाहूयात स्ट्रेचिंग करण्याचे फायदे (Benefits of Stretching Exercises)...
१. रक्तप्रवाह सुरळीत होण्यास फायदेशीर
रोज स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. स्नायूंच्या रिकव्हरीसाठी अशाप्रकारे रक्तप्रवाह सुरळीत होणे आवश्यक असल्याने एखाद्या स्नायूला सूज आली किंवा दुखत असेल तर ती लवकर बरी होण्यास मदत होते. त्यामुळे नियमितपणे स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.
२. पोश्चर सुधारण्यास मदत
दिवसभर बैठे काम असल्याने किंवा आणखी काही कारणाने आपले पोश्चर खराब झालेले असते. स्नायुंचे दुखणे आणि अंगदुखी होण्यामागे बैठे काम हे एक मुख्य कारण असते. मात्र नियमितपणे स्ट्रेचिंग केल्यास या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
३. ताण कमी होण्यास उपयुक्त
स्ट्रेचिंग करणे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते असे आपल्याला कोणी सांगितले तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पण स्ट्रेचिंगमुळे मेंदुपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे मेंदुला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि ताणतणाव कमी होण्यास आणि शांती मिळण्यास त्याचा फायदा होतो.