मनाली मगर-कदम
उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच आपल्याला खूप घाम येत असतो, त्यामुळे घामाघूम करणारा व्यायाम नको वाटतो. एकतर उन्हाळा म्हणजे मोठा दिवस आणि मुलांचेही सुट्टीचे दिवस असल्याने रिलॅक्स वातावरण. अशावेळी व्यायाम म्हणून आणि मज्जा म्हणूनही अनेक जण स्विमिंगला जाण्याचा विचार करतात. पोहणे हा अनेकांसाठी आवडता खेळ तर असतोच पण तो उत्तम व्यायामप्रकारही आहे हे लक्षात घ्यायला हवे. स्विमिंगमुळे आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पाण्यामध्ये शरीराचा भार हलका होतो आणि सांध्यांवरील भार नाहीसा होतो. त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे अशांसाठी हा अतिशय फायद्याचा व्यायाम समजला जातो. शरीरातली चरबी घटवण्यासाठी तसेच इतरही अनेक गोष्टींसाठी यापेक्षा दुसरा चांगला व्यायाम प्रकार नाही. पाहूयात स्विमिंगचे शरीराला होणारे फायदे (Benefits Of Swimming in Summer).
१. आपले वजन जास्त असेल तर इतर व्यायाम प्रकारांमध्ये गुडघ्यावर ताण येण्याची शक्यता असते पाण्यामध्ये ही भीती नसते.
२. पोहल्याने चरबीचे प्रमाण कमी होते.
३. पोहण्याने इन्सुलिनचा वापर वाढतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे डायबेटीस सारख्या आजारांना पळवून लावता येते.
४. पोहण्याने सांधेदुखीचे प्रमाण कमी होते.
५. शरीराची लवचिकता वाढण्यास पोहण्याचा फायदा होतो.
६. पाण्यात राहिल्याने उन्हामुळे होणारा शरीराचा दाह कमी होण्यास मदत होते.
७. पोहण्याने अॅसिडिटी, पित्त यासांरखे त्रास कमी होतात.
८. कार्डिओ म्हणजेच हृदयासाठी उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाची ताकद वाढते आणि पूर्ण शरीराला रक्तप्रवाह होतो.
९. फुफ्फुसांसाठी पोहणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोरोना, अस्थमा, टी बी असे फुफ्फुसांचे आजार दूर राहतात.
१०. सर्वात महत्त्वाचे, मन शांत होण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी पोहणे हा उत्तम व्यायामप्रकार आहे.
(लेखिका योग शिक्षिका आहेत)
manali227@gmail.com