नियमित व्यायामामुळे फिटनेस राखता येतो हे फारच वापरुन वापरुन गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. फिटनेस म्हणजे केवळ शरीराची सुडौलता नव्हे. तर शरीराच्या सुडौलतेसोबतच स्नायुंना बळकटी, आंतरिक अवयवांना ताकद आणि ऊर्जा, रोगांशी लढण्याची शक्ती आणि मन:शांती या सर्वांचा त्यात समावेश होतो. यातल्या बहुतांश गरजा पूर्ण करणारा व्यायाम योग प्राणायमात सुखासन नावाने ओळखला जातो. एका आसनात विशिष्ट प्रकारे बसल्याने स्नायुंना ताकद मिळते, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि मानसिक आनंद मिळण्यासारखे आश्चर्यकारक फायदे मिळतात.सुखासन म्हणजे केवळ बसणं नव्हे तर या बसण्यात शास्त्र आणि तंत्रशुध्दता आहे. त्यापध्दतीने बसल्यावरच सुखासनाने अपेक्षित असणारे फायदे शरीर आणि मनास मिळतात.
Image: Google
सुखासन कसे करतात?
सुखासन हा संस्कृत शब्द आहे. सुख आणि आसन या दोन शब्दांनी मिळून तयार झालेला. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, शरीराची रोगांपासून बचाव करण्याची ताकद वाढते. शरीर आणि मनाला स्वास्थ्य, शांति आणि सुख मिळवून देण्यासाठीचं हे सोपं आसन आहे.सुखासन करताना सर्वात आधी जमिनीवर सतरंजी घालून मांडी घालून बसावं. सुखासन करताना मांडी घालून बसणं, अर्ध पद्मासन किंवा पूर्ण पदमासनात बसलं तरी चालतं. दोन्ही हात ओमच्या स्थितीत गुडघ्यावर टेकवावेत. सुखासन करताना पाठीचा कणा अगदी ताठ हवा. डोळे बंद करुन शरीरावरचा सर्व ताण पूर्णपणे काढून टाकावा.या आसनात दीर्घ श्वसन करत राहावं. या आसनात किमान दहा मिनिटं तरी बसावं.पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ज्यांना मणकेदुखी आहे त्यांनी सुखासन करणं टाळावं. तसेच हे आसन रिकाम्या पोटी करावं.
Image: Google
सुखासनानं काय मिळतं?
1. सुखासन या एका सोप्या आसनानं शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे हदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका कमी होतो.2. या आसनामुळे शरीर आणि मनावरील ताण कमी होतो.3. सुखासन केल्यानं एकाग्रता वाढते. हे आसन नियमित केल्यानं कोणतंही काम लक्षपूर्वक करण्याची क्षमता वाढते.
Image: Google
4. सुखासन नियमित केल्यानं मन शांत होतं, रागावर नियंत्रण ठेवता येतं. मेंदू शांत राहातो.5. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी नियमित सुखासनाचा उपयोग होतो.6. सुखासन केल्यानं छाती, पाय, मांड्या आणि हाताचे स्नायू मजबूत होतात.