Join us  

कतरिना सांगतेय तिचा फिटनेस मंत्र ! व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी 'हे' करा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 5:15 PM

उंच आणि शिडशिडीत असणारी बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री म्हणजेच कतरिना कैफ. तिच्या फिटनेसचं रहस्य तिने नुकतंच सांगितलं आहे.

ठळक मुद्देआजचा व्यायाम उद्यावर ढकलत असाल, तर कतरिनाचं म्हणणं नक्कीच तुम्ही ऐकलं पाहिजे. 

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसारखी स्लिमट्रिम फिगर मिळविण्यासाठी अनेक तरूणींची धडपड सुरु असते. तिची जबरदस्त हाईट तर अनेकींना प्रचंड आवडते. आता तिच्यासारखी उंची मिळवणं तर आपल्या हातात नाही. पण तिच्याप्रमाणे फिट राहणं तर आपल्याला सहज जमू शकतं. म्हणूनच तर कतरिनाचा फिटनेस फंडा एकदा काय आहे, हे जाणूनच घ्याच.

 

करिना कपूर, शिल्पा शेट्टी किंवा अगदी आलिया भटसारखी फिटनेस फ्रिक वगैरे अशा काही नावांनी कतरिना कैफ ओळखली जात नाही. पण तरीही तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते. फार गाजावाजा न करताही फिट कसं रहायचं, हे कतरिनाला अगदी चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्यामुळे मोजका पण अगदी नियमित व्यायाम हे करिनाच्या फिटनेसचं एक वैशिष्ट्य आहे.फिटनेस राखण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, हे आपल्याला अगदी पक्क माहिती असतं.  नियमित व्यायाम करण्याचे भरपूर फायदेही आपण व्यवस्थित जाणून असतो. पण फिटनेस, आराेग्य याबाबत एवढं सगळं कळत असूनही, बऱ्याच जणांना ते वळत नाही. म्हणजेच इच्छाशक्ती असूनही किंवा दिवसेंदिवस आपला फिटनेस ढळत चालला आहे, हे माहिती असूनही आपली त्यासाठी काही करण्याची तयारी नसते.

 

बऱ्याचदा रात्री झोपताना आपण स्वत:ला अगदी ठासून सांगतो की, उद्यापासून आपण लवकर उठायचं आणि व्यायाम करायचा. पण सकाळी- सकाळी वाजणारे गजर आपण अगदी सहज बंद करून टाकतो आणि पुन्हा झोपून जातो. तुम्हीही असंच करत असाल आणि आजचा व्यायाम उद्यावर ढकलत असाल, तर कतरिनाचं म्हणणं नक्कीच तुम्ही ऐकलं पाहिजे. 

कतरिनाने तिचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती Pilates workout करताना दिसत आहे. या वर्कआऊटचे वेगवेगळे प्रकार ती अतिशय सराईतपणे करत असून यातूनच तिचा जबरदस्त फिटनेस दिसून येतो. वर्कआऊट करताना कतरिना खूपच उत्साही आणि आनंदी दिसत आहे. ती तिचा व्यायाम, तिचा फिटनेस खरोखरंच खूप एन्जॉय करते आहे, व्यायामाचा आनंद घेत आहे, हे तिच्या बॉडी लॅंग्वेज आणि चेहऱ्यावर असणाऱ्या हास्यातून अगदी स्पष्ट दिसते. हा व्हिडियाे शेअर करताना कतरिनाने 'I train my mind …….my body will follow …' अशी कॅप्शन दिली आहे.

 

व्यायामाचा कंटाळा करणाऱ्या व्यक्तींसाठी हा मंत्र अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. कारण विशेषत: महिलांमध्ये अशी चर्चा नेहमीच रंगलेली असते की 'मी खूप ठरवते गं व्यायाम करायचा, पण माझ्याकडून होतच नाही..' अशा सगळ्या मैत्रिणींनी कतरिनाचा सल्ला ऐकावा. व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे, हे आपल्याला मनाला आधी पटवून द्यावं. कदाचित कतरिनाप्रमाणेच तुमचं शरीरही तुमच्या मनाचं म्हणणं ऐकू लागेल आणि आपोआप व्यायाम करू लागेल. व्यायामाचा कंटाळा काढून टाकण्यासाठी हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही. 

इन्स्टाग्राम व्हिडियोमध्ये कतरिना करत असलेले Pilates workout सध्या खूपच ट्रेंडिंग असून अनेक बॉलीवुड स्टार हे वर्कआऊट करताना दिसतात. वेटलॉस आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी हा एक परफेक्ट व्यायाम मानला जातो. आकर्षक आणि तालबद्ध हालचाली करत होणारा हा व्यायाम आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा हा व्यायाम करावा. यामुळे बॉडी टोन सुधारण्यास मदत होते, असेही फिटनेसतज्ज्ञ सांगतात. इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने किंवा कोणतेही इन्स्ट्रुमेंट न घेता हा व्यायाम करता येतो.

Pilates workout चे फायदे१. या व्यायामामुळे शरीर लवचिक होते आणि मांसपेशींची ताकद वाढते.२. पाठीचा कणा, पोट, कंबर, मांड्या यांचा चांगला व्यायाम होते आणि तेथील स्नायूंना बळकटी मिळते.३. शरीराचा तोल सांभाळणे, शरीर नियंत्रित ठेवणे आणि एकाग्रता वाढणे हे देखील या वर्कआऊटचे फायदे आहेत.४. मानसिक ताण कमी करण्यासाठी Pilates workout फायद्याचे ठरते.५. Pilates workout मुळे फुफुसाची ताकद वाढते. त्यामुळे सध्या कोरोनाकाळात तर श्वसनसंस्थेचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी Pilates workout अतिशय महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सकतरिना कैफहेल्थ टिप्ससेलिब्रिटी