अभिनेत्री रविना टंडन हिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर नुकताच प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये रविनाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती एका निसर्गरम्य ठिकाणी जाऊन योगा करते आहे. या व्हिडियोमध्ये रविनाने अर्धपद्मासन घातले आहे आणि ती डोळे मिटून ध्यानस्थ बसली आहे. आजूबाजूला गर्द झाडी असून मंद मंद वारा सुरू आहे. अशा मस्त वातावरणात ध्यानस्थ बसणे किंवा योगा करणे खरोखरच अतिशय आनंददायी अनुभव ठरत असेल, असे तो व्हिडियो पाहणाऱ्याला जाणवून जाते.
या व्हिडियोसोबत रविनाने असे पोस्ट केले आहे, की निसर्गाच्या सान्निध्यात योगा करणे हा माझ्यासाठी अतिशय रम्य अनुभव असून यामुळे अतिशय सकारात्मक उर्जा मिळते. निसर्गरम्य ठिकाणी असल्यावर मला अतिशय समाधान मिळते. तुमचे जीवन संतूलित ठेवण्याचे काम योग करतो. त्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मनावर ताबा ठेवण्यासाठी रोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला मोकळी आणि शुद्ध हवा मिळते, जी आजच्या धकाधकीच्या जीवनात मिळणे कठीणझाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने छाती भरून शुद्ध हवा घेण्यासाठी आठवड्यातून एकदा शहराच्या बाहेर असणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणी जा आणि योगा करा, असे तज्ज्ञ सांगतात. याखेरीज निसर्गरम्य ठिकाणी ध्वनी प्रदुषण जवळपास नसतेच. म्हणूनच पक्ष्यांचा मंजूळ आवाज, पानांची सळसळ असे सुखद आवाज ऐकत योगा केल्याने खऱ्या अर्थाने मन:शांती मिळते. इतर कोणतेही आवाज नसल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि आपला स्वत:शी संवाद होऊ शकतो.