Join us  

रविना टंडनने सांगतेय निसर्गाच्या सान्निध्यात योगा करण्याचे 'हे' फायदे.. वाचाल तर आजपासूनच सुरू कराल !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 8:12 PM

काही वर्षांपुर्वी बॉलीवुड अभिनेत्री रविना टंडन हिने तिचे साैंदर्य आणि अभिनय कौशल्य यांच्या जोरावर अक्षरश: चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.आजही रविनाच्या सौंदर्याची चर्चा होत असते. निसर्गाच्या सान्निध्यात योगा करणे, हे तर तिच्या सौंदर्याचे सिक्रेट नाही ना? , असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे.

ठळक मुद्देप्रदुषणमुक्त मोकळ्या हवेत एक वेगळीच उर्जा असते. या हवेत नुसते फिरून आले, तर मन प्रफुल्लित होते. यात जर योगा करायला निसर्गाच्या कुशीतली जागा निवडली तर त्याचा निश्चितच अधिकच फायदा होतो.एखाद्या आजारी व्यक्तीला हवा बदल करण्यासाठीही डॉक्टर निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहण्याचा सल्ला देतात. तेथील फ्रेश हवा ही मन आणि शरीर दोन्हीही ताजे टवटवीत करणारी असते.

अभिनेत्री रविना टंडन हिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर नुकताच प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये रविनाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती एका निसर्गरम्य ठिकाणी जाऊन योगा करते आहे. या व्हिडियोमध्ये रविनाने अर्धपद्मासन घातले आहे आणि ती डोळे मिटून ध्यानस्थ बसली आहे. आजूबाजूला गर्द झाडी असून मंद मंद वारा सुरू आहे. अशा मस्त वातावरणात ध्यानस्थ बसणे किंवा योगा करणे खरोखरच अतिशय आनंददायी अनुभव ठरत असेल, असे तो व्हिडियो पाहणाऱ्याला जाणवून जाते.

या व्हिडियोसोबत रविनाने असे पोस्ट केले आहे, की निसर्गाच्या सान्निध्यात योगा करणे हा माझ्यासाठी अतिशय रम्य अनुभव असून यामुळे अतिशय सकारात्मक उर्जा मिळते. निसर्गरम्य ठिकाणी असल्यावर मला अतिशय समाधान मिळते. तुमचे जीवन संतूलित ठेवण्याचे काम योग करतो. त्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मनावर ताबा ठेवण्यासाठी रोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराला मोकळी आणि शुद्ध हवा मिळते, जी आजच्या धकाधकीच्या जीवनात मिळणे कठीणझाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने छाती भरून शुद्ध हवा घेण्यासाठी आठवड्यातून एकदा शहराच्या बाहेर असणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणी जा आणि योगा करा, असे तज्ज्ञ सांगतात. याखेरीज निसर्गरम्य ठिकाणी ध्वनी प्रदुषण जवळपास नसतेच. म्हणूनच पक्ष्यांचा मंजूळ आवाज, पानांची सळसळ असे सुखद आवाज ऐकत योगा केल्याने खऱ्या अर्थाने मन:शांती मिळते. इतर कोणतेही आवाज नसल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि आपला स्वत:शी संवाद होऊ शकतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यरवीना टंडन