शिल्पा शेट्टीने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने योगासनांचा एक व्हिडियो शेअर केला आहे. शिल्पा शेट्टी आणि योगा हे समीकरण काही नवे नाही. पण या पोस्ट मध्ये तिने शेअर केलेल्या ज्या भावना आहेत, त्या महत्त्वाच्या आणि लक्षवेधी आहे. यामध्ये शिल्पाने
"Be your own warrior; strong enough to make and defend positive change in your life!" असे म्हटले आहे. पुढे ती म्हणते की, अवघड काळात योगाच मला आधार देत असून अशा कठीण परिस्थितीत संतुलित, सकारात्मक आणि हिंमत टिकवून ठेवण्यासाठी योगाची मोठी मदत होते आहे. परिस्थिती चांगली असो की वाईट, योगा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्रा अडकल्यानंतर शिल्पादेखील त्या प्रकरणात चांगलीच गोवल्या गेली. या प्रकरणात शिल्पाचाही हात असेल, असा संशयही बरेच दिवस व्यक्त केला गेला. याप्रकरणामुळे शिल्पाची खूप बदनामी तर झालीच पण अनेक मित्रांनीही या प्रकरणात तिच्यापासून दूर राहणेच पसंत केले. या सगळ्या गाेष्टींमुळे शिल्पावर प्रचंड मानसिक आघात झाला होता. पण आता या प्रकरणातून बाहेर येण्याचा शिल्पा कसोशीने प्रयत्न करत असून, "योगा से ही होगा..." असे ती सांगत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडियोमध्ये शिल्पाने वीरभद्रासन, मालासन करून दाखविले आहेत आणि त्याचे शरीराला होणारे फायदे देखील सांगितले आहेत. शिल्पा सांगते की वीरभद्रासन केल्यामुळे मांड्या, घोटे, पाय, शोल्डर आणि बॅक मसल्स यांचे चांगल्या पद्धतीने स्ट्रेचिंग होऊन ते मजबूत होतात. यामुळे बॉडी पोश्चरदेखील सुधारते आणि मन तसेच शरीरही एकाग्र, संतुलित आणि स्थिर ठेवण्यासाठी या आसनाची मदत होते. रक्ताभिसरण आणि श्वसन संस्थेचे कार्यही चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी वीरभद्रासन फायदेशीर ठरते.
मालासनाविषयी सांगताना शिल्पा म्हणते की, पाठ, घोटे, मान आणि गुडघ्यांजवळचे स्नायू मजबूत करण्यासाठी मालासनाचा उपयोग होतो. पचनाचे विकारदेखील या आसनाने दूर होतात तसेच बॉडी पोश्चर सुधारण्यासाठीही मालासनाची मदत होते, असेही शिल्पाने सांगितले आहे. ही आसने केल्यानंतर अथर्ववेदात सांगितल्यानुसार शांती सुक्त करणे हे एक कंम्प्लिट पॅकेज असून याद्वारे मन आणि शरीर या दोघांनाही फायदा होतो.
शिल्पाने हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर तिला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. पण बहुतांश कमेंट्स या राज कुंद्राशी निगडीत आहेत. अजूनही शिल्पाला याप्रकरणावरून खूप ट्रोल केले जात असल्याचे कंमेट्स वाचून लक्षात येते.