व्यायाम म्हटलं की फक्त शारीरिक कस लागणारेच असावेत, आरोग्य राखण्यासाठी फक्त त्याचाच फायदा होतो असं नाही. रोजच्या व्यायामात श्वसनाच्या व्यायामासाठी वेळ राखून तो केल्यास फुप्फुसांची क्षमता वाढते. आज कोरोनाच्या लढाईत फुप्फुसांच्या क्षमतेला खूप महत्त्व आहे. साध्या सोप्या श्वसन व्यायामानं ही क्षमता वाढू शकते. मुख्य व्यायाम झाल्यानंतर श्वसनाचे व्यायाम करावेत. पण अनेकजण या व्यायामास वेळ नाही, काम आहे, घाई आहे या कारणांनी फाटा देतात.
व्यायाम प्रकारात श्वसनाच्या व्यायाम प्रकारांनाही तितकंच महत्त्व आहे. श्वसनाच्या व्यायामांचा अनेक प्रकारे फायदा होत असतो. शारीरिक, भावनिक, मानसिक स्तरावर त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात. श्वसनाच्या व्यायामामुळे शरीर आणि मनावरचा ताण एकदम कमी होतो. हा व्यायाम केल्यानंतर छान हलकं वाटतं. श्वसनाचे व्यायाम शिकून घेऊन ते नियमित करणं महत्त्वाचं असतं. श्वसनाचे व्यायाम शिकण्यास सोपे असतात. शिवाय ते करण्यासाठी विशिष्ट जागाच लागते असं नाही. व्यायामाच्या वेळेस ते करावेत हे खरं असलं तरी तेव्हा नाही जमलं तर ते टाळण्यापेक्षा दिवसभरात जेव्हा जमेल, जिथे जमेल तिथे ते करावेत. श्वसनाचे व्यायाम करायला कोणत्याही साधन सामग्रीची गरज नसते.
श्वसनाच्या व्यायामाचे फायदे
- श्वसनाच्या व्यायामानं शरीरात ऑक्सिजन वाढतं आणि मन शांत होतं. मनावरचा ताण घालवण्यासाठी तसेच मनातली भीती घालवण्यासाठीही श्वसनाचे व्यायाम हे फायदेशीर असतात.
- श्वसनाच्या व्यायामानं आपल्या शरीरास आराम मिळतो. मन शांत होतं. यामुळे ताण , भीती निघून जाते. त्याचा परिणाम म्हणजे या व्यायामानं रात्री शांत झोप लागते.
- मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास श्वसनाचे व्यायाम मदत करतात. फक्त ते नियमित करावे लागतात. श्वसन व्यायाम नियमित केल्यास कोणत्याही कामातली एकाग्रता आणि लक्ष देण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती सुधारते. शिवाय निर्णय क्षमतेतही सुधारणा होते.
- नियमित स्तरावर जर श्वसनाचे व्यायाम केले तर रक्तदाब नियंत्रित राहातो. हायपरटेन्शनचा त्रास असणाऱ्यांना श्वसनाच्या व्यायामाचा फायदा होतो. या व्यायामानं पक्षाघाताचा, हदय विकाराच्या धक्याचा धोका कमी होतो. हदयाचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी श्वसनाचे व्यायाम खूप मदत करतात.
- फुप्फुसाचं कार्य सुधारण्यासाठी श्वसानाचे व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर सध्या रोज देत आहेत. दमा, इम्फायसेमा, ब्रॉंन्काइटिस यासारख्या धोकादायक फुप्फुस विकारात श्वसनाच्या व्यायामांचा खूप फायदा होत असल्याचं संशोधनातून सिध्द झालं आहे.
- शरीरातील विषारी वायू, कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकण्यास श्वसनाचे व्यायाम मदत करतात.
- पचनसंस्थेचं कार्य सुलभ करण्याचं काम श्वसनाचे व्यायाम करतात. तसेच जठर आणि आतड्यांमधेनिर्माण होणाऱ्या समस्या जसे पोटातील वात, बध्दकोष्ठता, पोटात गोळे येणे, अपचन या विकारांपासून मुक्तता मिळते.
- प्राणायाम सारख्या श्वसनाच्या व्यायामामुळे रक्तात ऑक्सिजन मुबलक राहातं. त्याचा फायदा रक्तप्रवाह सूधारण्यास होतो आणि त्याचा परिणाम चेहेऱ्यावर दिसतो. रक्तातील विषारी घटक या व्यायाम प्रकारानं बाहेर पडत असल्यानं त्वचा तरुण आणि चमकदार दिसते.
- जुन्या सायनस विकारांवरही श्वसनाचे व्यायाम उपयुक्त ठरतात.
- कपालभाती प्राणायाम या प्रकारच्या श्वसनाच्या व्यायामानं ओटीपोटाच्या स्नायुंचाही व्यायाम होतो . त्यामुळे ओटी पोटावरची चरबी जाण्यास, पोटांच्या स्नायुंना आकार येण्यास मदत होते.
- श्वसनाचे व्यायाम नियमित केल्यास शरीराची रोगांशी लढणारी संरक्षक यंत्रणा अधिक ताकदवान होते, परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-श्वसनाच्या व्यायामानं वजन नियंत्रित राहातं, चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत, त्वचा चमकदार होते, ताण निवळतो तसेच शरीराची ठेवणही सुधारते.