आपल्याला कधी गॅसेस होतात तर कधी अॅसिडीटी, कधी पाळीचा आपल्याला खूप त्रास होतो तर कधी दिवसभर बैठे काम केल्याने आपली पाठ आणि खांदे आखडतात. या सगळ्या समस्यांसाठी काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी लगेचच डॉक्टरांकडे जाऊन औषधे न घेता काही सोपे उपाय केल्यास घरच्या घरी आपण हे त्रास काही प्रमाणात तरी आटोक्यात आणू शकतो. योगासने हा अतिशय उपयुक्त व्यायामप्रकार असून बहुतांश समस्यांसाठी योगासने करणे फायदेशीर असते. प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी एक सोपे आसन सांगितले आहे. अनुष्का या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि करीना कपूर यांच्या फिटनेस ट्रेनर असून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या कायम काही ना काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात (Camel Pose for Multiple Health Problems).
उष्ट्रासन करण्याचे फायदे
अनुष्का सांगतात नियमित उष्ट्रासन केल्याने खांदे, ओटीपोट आणि मांड्यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. खांदे रुंद होण्यासाठी, श्वसनक्रिया सुधारण्यासाठी आणि कंबरदुखी कमी होण्यासाठीही या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. मांडीचा मागच्या भागात ताकद येण्यासाठीही या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. सतत बैठ्या कामामुळे आपल्या शरीराची ठेवण बिघडते. अशावेळी हे आसन करण्यामुळे शरीराची ठेवण नीट होण्यास मदत होते. शरीराच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग होण्यासाठीही हे आसन अतिशय फायदेशीर आहे.
कोणी करु नये?
ज्यांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे, पाठीच्या किंवा मानेच्या समस्या आहेत अशांनी हे आसन करणे टाळावे असेही अनुष्का आपल्या पोस्टच्या शेवटी सांगतात.
आसन कसे करायचे?
वज्रासनात बसायचे, त्यानंतर मांड्या उचलून गुडघ्यांवर बसायचे. यावेळी पायाच्या बोटे आणि गुडघ्यांवर संपूर्ण शरीराचा भार घ्यायचा. पाठीतून मागे वाकायचे आणि दोन्ही हातांनी पायाच्या टाचा पकडायच्या. काही वेळ याच अवस्थेत थांबायचे. याच क्रमाने हळूवारपणे आसन सोडायचे.