Join us  

झोपच येत नाही? शांत झोपेसाठी करा 3 योगासनं; झोपेची आराधना करण्याची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 5:34 PM

झोपेआधी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही. कारण त्यामुळे झोप उडते. पण झोपण्याआधी योगासनातील (yoga asanas for better sleep) 3 आसनांची मदत घेतल्यास झोप पटकन येते आणि शांत झोप लागते.

ठळक मुद्देशवासन केल्यानं शरीराप्रमाणे मनावरचा ताणही निघून जातो. मन शांत होतं. त्याचा फायदा झोप लवकर येते.चांगली झोप येण्यासाठी 1 ते 5 मिनिटं हालासन करावं.

रात्री पटकन झोप लागणं, शांत झोप लागणं हे एक सुख आहे. पण ते सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. अनेकांना गादीवर पडून झोप येण्याची वाट बघत बसावी लागते. अनेकांना उशिरा आणि अस्वस्थ झोप लागते. झोप येत नाही त्यामुळे मनात विचार येतात. विचार आल्यानं झोप येत नाही असं चक्र सतत सुरु राहातं. शांत आणि पुरेशी झोप न झाल्यानं त्याचा ऊर्जेवर आणि कामावरच परिणाम होतो असं नाही तर शारीरिक मानसिक आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी झोप लवकर लागणं, शांत झोप लागणं आवश्यक आहे. झोप जर पटकन येत नसेल तर योगासनांची (Yoga asanas for better sleep)  मदत घ्यायला हवी. झोपेआधी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही. कारण त्यामुळे झोप उडते. पण झोपण्याआधी योगासनातील 3 आसनांची मदत घेतल्यास झोप पटकन येते आणि शांत झोप लागते. 

1. शवासन

झोप येण्यासाठी शवासन हे योगासनातील उत्तम आसन आहे. शवासन करणं सोपं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे आसन सहज करु शकते. शवासन करण्यासाठी जमिनीवर सतरंजी अंथरावी. सतरंजीवर सरळ झोपावं. सर्व अवयवावरील ताण काढून टाकावा. दोन्ही हात छताच्या दिशेने जमिनीला टेकलेले आणि पाय दोन्ही बाजूंनी कललेले असावेत. मान एका बाजूला कललेली असावी. डोळे मिटलेले असावे. एक दीर्घ श्वास घेऊन नंतर अगदी मंद श्वसन सुरु ठेवावं. एक 5-10 मिनिटं याच अवस्थेत पडून राहावं. शवासन केल्यानं शरीराप्रमाणे मनावरचा ताणही निघून जातो. मन शांत होतं. त्याचा फायदा झोप लवकर येते आणि शांत झोप लागते. 

Image: Google

2. बालासन

बालासन केल्यानं मनावरचा ताण, मनातील भीती निघून जाते. झोप येण्यासाठी हे उत्तम आसन आहे. या आसनामुळे पाठ दुखी, शरीर आखडणं या समस्यांवरही आराम मिळतो. बालासन करण्यासाठी जमिनीवर  गुडघ्यांवर ताठ बसावं. डोकं पुढे जमिनीच्या दिशेने झुकवत कपाळ जमिनीला टेकवावं. दोन्ही हात पाठीवर एकमेकात गुंफलेले ठेवावेत. या आसनात काही वेळ राहिल्यास पाठीला आराम मिळतो. शरीरावरचा ताण कमी होतो. 

Image: Google

3. हालासन

चांगली झोप येण्यासाठी 1 ते 5 मिनिटं हालासन करावं. हालासन केल्यानं रक्तप्रवाह चांगला राहातो. झोप येण्यास मदत होते. हालासन करण्यासाठी जमिनीवर ताठ झोपावं. दोन्ही हात कमरेच्या जवळ ताठ ठेवावेत. दोन्ही पाय वर उचलावे. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यावा. दोन्ही पाय डोक्याच्या वर नेऊन उलट्या बाजूनं जमिनीच्या दिशेने न्यावेत. पायाचे अंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हात जमिनीवर ताठ ठेवावेत किंवा दोन्ही हात एकमेकात गुंफलेले असावेत. हालासन केल्यानं पाठ, कंबर आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हालासन केल्यानं शांत झोप लागते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे