Join us  

सारखा अपचनाचा त्रास आणि कंबरदुखी? पचन सुधारण्यासाठी हा घ्या उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 6:29 PM

कंबरदुखी म्हणजे जणू काही आपल्या अनेक मैत्रिणींच्या पाचवीलाच पुजलेली आहे... एक ठराविक वय झालं की कंबरदुखीचा त्रास प्रत्येकीलाच छळू लागतो. म्हणूनच हा घ्या कंबरदुखीवरचा एक उत्तम उपाय.

ठळक मुद्देपाठदुखीचा त्रास जाणवत असल्यास अश्वसंचालनासन करण्याचा सल्ला दिला जातो.

बसण्या- उठण्याची, चालण्याची चुकीची सवय, कोणताही विचार न करता झपकन खाली वाकणं, तितक्याच जलद वर येणं, खाली वाकून जड सामान उचलणं .... असं सगळं आपण करतो आणि आपल्या कंबरेला, पाठीला खूप खूप छळतो. मग मात्र तिची सहनशक्ती संपते आणि त्यानंतर मात्र उरलेलं सगळं आयुष्य ती आपल्याला छळत राहते. त्यात महिलांना आयुष्यात एक- दोनदा बाळांतपणालाही सामाेरं जावं लागतं. कधी गर्भपाताचा त्रास... असं सगळं सोसून झालं की कंबरेचं दुखणं मग उफाळून येतं. 

 

कंबरदुखी एकदा मागे लागली की मग त्यानंतर तुम्ही कितीही मलम चोळा किंवा गोळ्या घ्या. तात्पुरता फरक पडतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत कंबरेचं दुखणं सुरू होतं. कंबरदुखी थांबविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. कंबरदुखी कमी होण्यासाठी आणि शरीराचे मेटाबाॅलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अश्व संचालनासन अतिशय फायदेशीर ठरते. अश्वसंचालनासन म्हणजे सुर्यनमस्कारातील ४ थी आणि ९ वी अवस्था. या अवस्थेलाच अश्वसंचालनासन असे म्हणतात. 

 

अश्व संचालनासन का आणि कसं करावं, त्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात हे नुकतंच मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा हिने सांगितलं आहे. आपल्याला माहितीच आहे की मलायका दर सोमवारी तिच्या चाहत्यांना त्या- त्या आठवड्यासाठी फिटनेस मोटिव्हेशन देत असते. त्यानुसार मलायकाने तिच्या चाहत्यांना या आठवड्यात अश्व संचालनासन करण्याचा सल्ला दिला आहे. मलायकाने थोड्या वेगळ्या प्रकारे हे आसन केले असून आसन करताना दोन्ही हातात विटा घेतल्या आहेत. पण आपण असे काही प्रयोग नाही केले तरी चालतात. सुर्यनमस्कार करताना ४ आणि ९ या क्रमांकाला आपली जी अवस्था असते, त्या अवस्थेत आपण अश्वसंचालनासन केले तरी चालते. 

 

पचनाचे त्रास होतात दूरसाधारण वयाच्या तिशीनंतर चयापचय क्रिया मंदावत जाते. त्यामुळे आपण जे खातो, ते सगळेच आपल्याला पचत नाही. यामुळे अपचन, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता असे त्रास वाढू लागतात. हा त्रास कमी करायचा असेल तर चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्याची गरज आहे. नियमितपणे अश्वसंचालन केल्यास पोटावर एक ठराविक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे पोटाच्या आतील अवयवांचा व्यायाम होऊन चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे ज्यांना वारंवार पोटदुखी किंवा अपचन असा त्रास जाणवत असेल तर त्यांनी दररोज १ मिनिटासाठी तरी अश्वसंचालनासन केले पाहिजे.

 

अश्वसंचालनासन करण्याचे फायदे- अश्वसंचालनासन केल्यामुळे विशेषत: महिलांमध्ये जाणवून येणारा कंबरदुखीचा त्रास खूप कमी होतो.- कंबर लवचिक होण्यास आणि कंबरेच्या हालचाली योग्य पद्धतीने होण्यास अश्वसंचालनासन उपयुक्त ठरते.- अश्वसंचालन केल्यास पचनाचा त्रास कमी होतो.- या आसनामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते.- हे आसन नियमित केल्यामुळे एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही हे आसन नियमितपणे करणे उपयुक्त ठरते. 

- मज्जासंस्थेचा व्यायाम होण्यासाठी अश्वसंचालनासन नियमितपणे करावे.- पाठदुखीचा त्रास जाणवत असल्यास अश्वसंचालनासन करण्याचा सल्ला दिला जातो.- हे आसन केल्यामुळे पोटऱ्या आणि मांड्या यांचा पण व्यायाम होतो. - लेग टोन्ड होण्यासाठी म्हणजेच पायांना सुडौल आकार प्राप्त होण्यासाठी अश्वसंचालनासन करणे योग्य ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्समलायका अरोरायोगासने प्रकार व फायदे