Join us  

सतत बैठे काम करता, पाठ-मानेचे दुखणं मागे लागलं? करा ४ व्यायाम, व्हा रिलॅक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 5:55 PM

काम करताना ठराविक वेळाने मधे उठून काही सोपे व्यायामप्रकार केल्यास पाठदुखी सतावत नाही. पाहूया हे व्यायामप्रकार कोणते...

ठळक मुद्देहे व्यायामप्रकार ऑफीसमध्ये असताना कुठे करणार असा प्रश्न तुम्हाला असेल तर अगदी आपल्या जागेवर किंवा ऑफीसच्या खालच्या मोकळ्या जागेत अगदी वॉशरुममध्येही करु शकतो.सतत त्याच पोझिशनमध्ये बसल्याने पाठ-मान अवघडते, अशावेळी मधे उठून सोपे व्यायामप्रकार करायला हवेत.

दिवसभर ऑफीसमध्ये लॅपटॉपसमोर बसून आपली पाठ-मान पार अवघडून जाते. एकदा सकाळी १० वाजता काम सुरू केलं की आपण थेट १.३० नंतर जेवायलाच काय ते उठतो. त्यानंतर रात्री किती वाजेपर्यंत काम सुरू राहील याचा नेम नाही. खुर्ची कितीची चांगली असूदे, आपण दिवसभर कितीही चांगल्या पोश्चरमध्ये बसलेले असूदे तरी काही वेळाने आपल्या पाठीच्या मधल्या भागातून कळा यायला लागतात. एकदा ही पाठ दुखायला लागली की काय करावे ते आपल्याला कळत नाही. समोर कामाचा डोंगर असल्याने आपण या दुखणाऱ्या पाठीकडे दुर्लक्ष करतो आणि तसेच काम करत राहतो. मग घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक आणि घरातल्या गोष्टी असतातच. अशावेळी रात्री पाठ टेकली की मगच आपल्याला ती दुखत होती हे पुन्हा एकदा आठवते. पण काम करताना ठराविक वेळाने मधे उठून काही सोपे व्यायामप्रकार केल्यास पाठदुखी सतावत नाही. पाहूया हे व्यायामप्रकार कोणते...

१. पाठ मागे आणि बाजूला वाकवा  

दर काही वेळाने जागेवरुन उठून दोन्ही हात कंबरेवर ठेवा. पाठीतून मागच्या बाजूला वाकण्याचा प्रयत्न करा. दिवसभर आपण कामाच्या नादात पुढच्या बाजूला वाकलेलो असतो. त्यामुळे आपल्या मणक्यावर एकप्रकारचा ताण येतो. त्यामुळे मागच्या बाजूला वाकल्याने आपल्या शिरा काहीशा ताणल्या जातात आणि आपल्याला चांगले वाटू शकते. असेच कंबरेतून उजव्या आणि डाव्या बाजूलाही ताण द्या. यामुळे आखडलेल्या शिरा मोकळ्या होतात. 

(Image : Google)

२. कंबर गोल फिरवा

एकाच पोझिशनमध्ये दिवसभर बसल्याने स्नायू आखडले जातात. अशावेळी त्यांना थोडी चालना मिळाल्यास ते मोकळे होण्यास मदत होते. दोन्ही हात कंबरेवर ठेवून कंबर गोल फिरवा. दोन्ही बाजूने किमान ५ वेळा कंबर फिरवल्यानंतर पाठीत होणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. कंबरेतून वळून मागे बघा 

पाठीला एकाच पोझिशनमुळे ताण आलेला असू शकतो. अशावेळी दोन्ही हात मोकळे सोडून कंबरेतून वळून मागच्या बाजूला बघा. असे दोन्ही बाजूने शक्य तितक्या वेळा करा. यामुळे पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. आता हे व्यायामप्रकार ऑफीसमध्ये असताना कुठे करणार असा प्रश्न तुम्हाला असेल तर अगदी आपल्या जागेवर किंवा ऑफीसच्या खालच्या मोकळ्या जागेत अगदी वॉशरुममध्येही करु शकतो.

(Image : Google)
 

४. मान आणि हात फिरवा 

दिवसभर कॉम्प्युटरवर काम केल्याने आपले खांदे आणि मान एकाच पोझिशनमध्ये असतात. त्यामुळे तेही अवघडतात. मानेचा आणि खांद्याचा ताण नकळत पाठीवर येतो. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मान गोलाकार फिरवा. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूलाही फिरवा. हाताचे स्नायू मोकळे करण्यासाठी हातही गोलाकार फिरवा. हाताचे वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रेचिंग केल्याने खांदे आणि हात मोकळे होण्यास मदत होईल.  

(Image : Google)

टॅग्स :फिटनेस टिप्सपाठीचे दुखणे उपायलाइफस्टाइल