वृषाली जोशी -ढोके
बरेच जण आजकाल पोटाच्या व्याधींनी ग्रासलेले दिसतात. बद्धकोष्ठता, भूक न लागणे पोटफुगी, अनियमित मलोत्सर्ग, वारंवार शौचास होणे या तक्रारी सर्व वयोगटात प्रकर्षाने दिसून येतात. पचन संस्थेचा बिघाड हा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आहे हे संशोधनाने सिध्द झाले आहे. पोट साफ नसेल तर आपोआपच त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो आणि आपली चिडचिड सुरू होते आणि मानसिक त्रास वाढतो. आधुनिक जीवशैली मुळे आहारविहार पद्धत बदलली आहे. जसे की ब्रेड, पिझ्झा, बिस्किट हे कधी तरी खाल्ले जाणारे पदार्थ आजकाल रोजची गरज झाली आहे. पोळी -भाजी- वरण -भात -चटणी -कोशिंबीर -ताक असा परिपूर्ण स्वैपाक फक्त सणावारालाच बघायला मिळतो. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य धन संपत्ती लाभे असे आपले आजीआजोबा सांगत असत पण आजकाल रात्र रात्र जागून प्रोजेक्ट्स कंप्लीट करणे, मॅच बघणे, वेबसीरिज बघणे, परीक्षे आधी नाईटस मारणे या सगळ्या मध्ये रात्री झोपायचे असते हेच आपण विसरलो आहोत. या " मॉडर्न" जीवनशैली मुळे आपण आपले स्वास्थ्य, मनःशांती हरवून बसलो आहोत. बरेच वेळा तंतुमय पदार्थ खाऊन, रेचक देऊन किंवा औषधे घेऊन बद्धकोष्टतेसारखे विकार बरे केले जातात परंतु ते क्षणिक आहेत. औषधे घेऊन काही दिवस बरे वाटते परंतु पुन्हा तोच तोच त्रास उद्भवत असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे आपला योगाभ्यास.
(छायाचित्र- गुगल)
योग साधनेमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम तर मिळतोच परंतु बळकटी ही मिळते. योगाभ्यास शारीरिक तसेच मानसिक पातळीवर काम करतो त्या मुळे कोणत्याही आजारातून पुर्णपणे बाहेर पडण्यास मदत होते. आसनं आणि प्राणायामाचा रोजचा अभ्यास त्याचबरोबर शुद्धी क्रिया केल्यास अंतरेंद्रिये घासून पुसून स्वच्छ होतात आणि त्याची चकाकी चेहेऱ्यावर सुद्धा दिसून येते. खालील काही योगासनांचा अभ्यास दररोज केल्याने बद्धकोष्ठता, पचनाच्या तक्रारी यावर निश्चित फायदा होणार आहे.१. पवनमुक्तासनया आसनामुळे पोटावर पद्धतशीर आणि चांगला दाब आल्याने मोठ्या आतड्यातील अपानवायू (गॅसेस) शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. पचन क्रिया सुधारते आणि शौचाला साफ होते२. भुजंगासनया आसनामध्ये संपूर्ण शरीराचा दाब पोटावर येतो त्यामुळे पाचक रस चांगल्या प्रकार तयार होतो स्वादुपिंड यकृत यांच्यावर चांगला दाब आल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.
(छायाचित्र- गुगल)
३. सेतूबंधासनपोटावर चांगलाच ताण निर्माण होतो. पोटातील अवयव ताणले गेल्याने त्यांना व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते, ताण, नैराश्य कमी व्हायला मदत होते.वरील आसने करत असताना ज्यांना हर्निया आहे, पोटाच्या शत्रकिया झाल्या आहेत किंवा आतड्याचा कॅन्सर, अल्सरसारखे विकार असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शन खाली अभ्यास करावा. तंतुमय पदार्थ जसे की भाकरी, सालासहित फळे, पालेभाज्या हे देखील रोजच्या आहारात घ्यावे जेणे करून पोट साफ राहील आणि भूक चांगली लागेल.
(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)