Join us  

हिवाळ्यात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी करा ५ आसनं; शरीर-मन राहील तंदुरुस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 6:03 PM

Winter Exercise Yogasana's योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत. तर हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देखील देतील.

हिवाळा सुरू झाला की, प्रत्येक जण थंडीपासून स्वतः चा कसा बचाव करेल, आणि कसं आपल्या शरीराला उबदार ठेवेल याची काळजी घेत असतो. बरेच जण व्यायाम देखील करण्यास टाळाटाळ करतात. हिवाळ्यात जर शरीर तंदुरस्त ठेवायचे असेल तर, योगासनापेक्षा उत्तम पर्याय नाही. योग मनासह शरीराला देखील स्थिर ठेवण्यास मदत करते. योगासने घरच्या घरी प्रभावीपणे करता येतात. आज आपण अशाच पाच योगासनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपलं शरीर उबदार ठेवेल, तसेच फिट राहण्यास देखील मदत करेल.

वशिष्ठासन

वशिष्ठासन या आसनाला 'साईड प्लँक पोज' असेही म्हणतात. सर्वप्रथम हाताने योगा मॅटवर बसा आणि पाय सरळ पसरवा. हाताच्या ताकदीचा वापर करून, आपले शरीर तुमच्या बाजूला उचला जेणेकरून आपले शरीर जमिनीच्या 45 अंश कोनात असेल. दुसरा हात सरळ हवेत वर करा. मजल्याच्या संपर्कात असलेल्या पायावर दुसऱ्या पायाने विश्रांती घ्या. हे आसन केल्याने पाय, ओटीपोट आणि हात मजबूत बनते.पायांच्या मागील बाजूस चांगला ताण येतो. या आसनाने संतुलनाची भावना सुधारली जाते. 

नौकासन

नौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. या आसनात शरीराचा आकार नावेसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन म्हटले जाते. सर्वप्रथम पोटावर झोपावे, पावले जुळली असावीत. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचे बॅलन्स येईल. ह्या स्थितीत थोडे थांबावे. आणि सावकाश आसन सोडावे.

शीर्षासन

शीर्षासन या शब्दाची फोड केली तर संस्कृतातील ‘शीर्ष’ आणि ‘आसन’ अशी त्याची फोड होते. शीर्ष म्हणजे डोकं आणि आसन म्हणजे ते करण्याची पद्धत. सर्वप्रथम, दोन्ही पाय दुमडून वज्रासनामध्ये या. दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवून डोकं त्या बोटांमध्ये व्यस्थित ठेवा. आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात पाय वर करता येणार नाही. पण थोडे लक्ष केंद्रित केले की, आपला पाय वर नेता येईल. पाय सरळ वर घेऊन अशा आसनात 30 सेकंद राहा. श्वास सुरळीत असू द्या. मानेची हालचाल करु नका. कारण त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. आसनात असताना काहीही त्रास होत असेल तर आसन सोडू शकता.

त्रिकोणासन

सर्वप्रथम जमिनीवर सरळ उभे राहावे. आता आपल्या पायांमध्ये तीन ते चार फुटांचे अंतर ठेवा. आता आपला उजवा पाय ९० अंशांमध्ये बाहेरील बाजूस न्यावा आणि डावा पाय सरळच ठेवावा. यादरम्यान संपूर्ण शरीराचा भार दोन्ही पायांवर समान ठेवावा. श्वासोच्छवासाची प्रक्रिया देखील सुरू ठेवावी. आता हळूहळू उजवीकडील बाजूस शरीर झुकवावे. आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडण्याचा प्रयत्न करावा.याच वेळेस आपला डावा हात वरील बाजूस सरळ रेषेमध्ये ठेवावा. डाव्या हातावर आपली दृष्टी केंद्रीत करण्याचा प्रयत्न करावा. आपले पाय गुडघ्यात आणि हात कोपरामध्ये दुमडू नये. डोके देखील खालील बाजूला वाकणार नाही, याची काळजी घ्यावी. शिवाय आपल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे. आता हेच आसन डाव्या पायाच्या बाजूने पुन्हा करावा, म्हणजे त्रिकोणासनाचा एक संच पूर्ण होईल.

शवासन

योगासनाचा अभ्यास झाल्यानंतर शवासन केले जाते. सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपा. हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचा पंजा वरच्या बाजूला असावा आणि बोटे अर्धवट उघडी असावी. पाय सरळ पसरलेला अवस्थेत ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना स्पर्श करतील व चवडे बाहेरच्या बाजूस झुकतील अशी पायांची स्थिती असू द्या. डोळे मिटा श्वास अगदी हळूहळू घेत रहा. आता अशी कल्पना करा कि आपले संपूर्ण शरीर हलके होत आहे. आपल्या शरीराला कुठलाच त्रास नाही, आपल्याला कुठलीच वेदना होत नाही. हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. परम्यात्म्याचे ध्यान करा. साधारणपणे १० ते १५ मिनिटांपर्यंत असे ध्यान करा. या मुळे विश्रांती व अतीव अश्या सुखाचा अनुभव येतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सथंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स