Join us  

वयाच्या तिशीत असाल तर रोज न चुकता करा ६ आसनं; चाळीशीचा प्रवास होईल सुकर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 3:01 PM

Do 6 yoga asna Regularly for good health and fitness : कितीही धावपळीत असलो तरी १५ मिनीटे काढून करायलाच हवीत अशी आसनं...

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या भूमिका, जबाबदाऱ्या पार पाडत असतो. त्या काळात आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. वयाच्या तिशीत आपण करिअर, लग्न, कुटुंबातील जबाबदाऱ्या यांसारख्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने अडकलेले असतो. सगळ्या पातळ्यांवर धावताना आपण स्वत:कडे पुरेसे लक्ष देतोच असे नाही. त्याचा आपल्या तब्येतीवर परीणाम होण्याची शक्यता असते. एकीकडे आपण चाळीशीकडे वाटचाल करत असतो आणि त्याचवेळी विविध भूमिकांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी आपले आरोग्य, आहार, फिटनेस याकडेही तितकेच नीट लक्ष द्यायला हवे. यासाठीच प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर आपल्या रुटीनमध्ये नियमितपणे असायला हवीत अशी काही आसने सांगतात, ती कोणती आणि कशी करायची पाहूया (Do 6 yoga asna Regularly for good health and fitness)...

१. एकपादासन

एका पायावर उभे राहून दुसऱ्या पायाचे पाऊल जांघेत-मांडीवर टेकवून ठेवायचे आणि बॅलन्स करायचा. दोन्ही हातांचा नमस्कार करुन दोन्ही बाजूला किमान १ मिनीटे अशाप्रकारे उभे राहण्याचा प्रयत्न करायचा. 

(Image : Google)

२. उत्कटकोनासन

दोन्ही पायात भरपूर अंतर घ्यायचे आणि दोन्ही पायांची पाऊले बाहेरच्या बाजूला येतील असे उभे राहायचे. गुडघ्यातून वाकायचे मात्र यावेळी पाठीचा मणका ताठ राहायला हवा. हातांचा नमस्कार करायचा आणि याच स्थितीत किमान ३० सेकंद उभे राहण्याचा प्रयत्न करायचा. किमान ३ ते ६ वेळा हे आसन केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.

३. बद्धकोनासन

खाली बसून दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जुळवायचे. पाय मांडीतून हलवण्याचा प्रयत्न करायचा. डोके पायाच्या बोटांवर पुढच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. हे आसन जास्तीत जास्त वेळ टिकवण्याचा प्रयत्न करायचा. दिवसातून शक्य तितक्या वेळेला हे आसन केलेले चांगले.

४. उष्ट्रासन

गुडघ्यांवर खाली बसायचे आणि कंबरेतून मागे वाकून दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या टाचा धरण्याचा प्रयत्न करायचा. हे आसन किमान ३० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करायचा. साधारण ३ ते ४ वेळा आसनाचा सराव करावा.

५. आनंदबालासन

लहान मूल ज्या पद्धतीने आनंदात खेळत असते ती स्थिती म्हणजे आनंदबालासन. पाठीवर झोपून दोन्ही हाताने दोन्ही पायाचे तळवे धरायचे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. रात्री झोपताना किमान ३ ते ५ मिनीटांसाठी हे आसन करावे, अतिशय रिलॅक्स वाटते.  

६. सुप्तबद्धकोनासन

पाठीवर झोपून पायाचे तळवे एकमेकांना जोडावेत आणि गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. झोपताना हे आसन आवर्जून करायला हवे.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेआरोग्य