झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूप जास्त गरजेची आहे. दिवसभरच्या थकव्यानंतर शरीराला अन्य कार्ये करण्यासाठी स्वत:ला तयार करण्याकरता झोपेची जास्त गरज असते. आपली सकाळची सुरुवात कशी होते, यावर आपल्या दिवसाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे आपली सकाळ खूप छान फ्रेश पद्धतीने झाली तर आपला दिवस खूपच छान जातो. आपल्यापैकी काहीजणांना अलार्म वाजल्या वाजल्या घाई गडबड करून अंथरुणातून उठायची सवय असते. काहीजण तर अंथरुणातून झटकन उठून कामे करण्यास सुरुवात करतात. परंतु आपल्या शरीरासाठी हे हानिकारक ठरू शकते. असे केल्यामुळे आपल्याला कधी कधी थकवा किंवा विकनेस जाणवतो. त्यामुळे सकाळी अलार्मच्या तालावर घाई गडबड करून उठण्यापेक्षा अंथरुणातून उठण्याचे एक सोपे रुटीन काय आहे ते समजून घेऊयात. सुदृढ आरोग्य हवे असेल तर आपल्याला अंथरुणातून उठण्यासाठीची ही योग्य पद्धत फॉलो केलीच पाहिजे(How To Wake Up Properly). सकाळी अंथरुणातून उठताना दिवसाची सुरुवात कशी करावी?
१. शरीराच्या उजव्या बाजूवर जोर देऊन उठा - आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार, सकाळी झोपेतून उठताना शरीराच्या उजव्या बाजूवर जोर देऊन उठावे. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरात सूर्य नाडी असते. ही सूर्य नाडी शरीराच्या उजव्या बाजूस असते म्हणून सकाळी झोपेतून उठताना शरीराच्या उजव्या बाजूवर जोर देऊन उठा. जेव्हा आपण शरीराच्या उजव्या बाजूवर जोर देऊन उठतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्या पाचनशक्तीला चालना देण्यास मदत होते. यामुळेच आपली पाचनशक्ती सुधारून आपले आरोग्य चांगले राहते. मानसशास्त्रीयदृष्ट्या, आपल्या शरीराची उजवी बाजू ही डाव्या बाजूच्या तुलनेत फारच स्थिर आणि भक्कम असते. त्यामुळे जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठताना उजव्या बाजूला वळतो तेव्हा आपल्या शरीराला एक प्रकारच्या स्थिरतेची भावना येते.
२. खांदे खेचून स्ट्रेच करा - रात्रभर झोपेत असताना आपण एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत असतो. कधी कधी आपण झोपेत रात्रभर एकाच कुशीवर झोपतो यामुळे आपल्या खांद्यांवर जोर दिला जाऊन ते दाबले जाऊ शकतात. झोपेत असताना आपल्या दोन्ही खांद्यांवर ताण येऊ शकतो. कधी एकाच खांद्यावर झोपल्यामुळे खांदे अवघडून येऊ शकतात. त्यामुळे सकाळी उठून अंथरुणात मांडी घालून बसून खांदे स्ट्रेच करून पाठीचा कणा ताठ करावा.
३. पाठीच्या मणक्याला ट्विस्ट करा - रात्रभर आपण झोपलेलो असताना आपल्या पाठीचा कणा हा आरामदायक मुद्रेत असतो . त्यामुळे सकाळी उठून आपल्या पाठीच्या कण्याला थोडे ट्विस्ट करा. पाठीच्या कण्याला ट्विस्ट करण्यासाठी मांडी घालून बसल्यानंतर पाठीच्या कण्यावर आणि कमरेवर ताण देऊन उजवीकडे आणि डावीकडे रोल होऊन झुका. असे केल्याने तुमच्या पाठीचा कणा आणि त्यांना आधार देणारे स्नायू मोकळे होतात. असे केल्याने ओटीपोटातील स्नायू ट्विस्ट होऊन मोकळे झाल्यामुळे आपल्या पचनसंस्थेला चालना मिळते. ४. भस्त्रिका प्राणायाम करा - आपण रात्री झोपल्यामुळे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया मंदावलेल्या असतात. संपूर्ण शरीराला सकाळी परत चालना देण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम करावे. सर्वप्रथम मांडी घालून बसावे. पाठ, मान डोके ताठ ठेवावेत. हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. तोंड बंद ठेवा. जलद व जोराने श्वास घ्या व तितक्याच जोराने श्वास सोडा. तसेच फुप्फुसाचे आकुंचन करा आणि नंतर फुलवा. श्वास घेताना झपाटय़ाने व जलद आत घ्यावा, व तसेच सोडावा म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम पूर्ण होईल. भस्त्रिका प्राणायाम करून झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून निर्माण होणारी उब आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल.
५. सकाळची प्रार्थना - सकाळी उठल्यावर दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी आपल्या आवडीच्या मंत्राचे किंवा देवाच्या नावाचा जप करा. आपल्या आयुष्यातील एक सुंदर सकाळ आपल्याला देवाने दिल्याबद्दल त्याचे आभार मानून दिवसाची सुरुवात करा.
६. शांत राहा - सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर किमान पहिले दोन तास शांत राहण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास कुठल्याही गॅजेट्सचा वापर करू नका. सकाळी उठल्यावर लगेच कुठल्याही सोशल मीडिया साईटचा वापर करणे टाळा.