Join us  

रोज सकाळी करा फक्त 3 आसनं.. शरीर आणि मन दिवसभरासाठी होईल फुल्ल चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 7:35 PM

भुजंगासन, ताडासन आणि सुखासन ही तीन आसनं रोज सकाळी न चुकता केल्यास शरीर मनावरचा ताण जाईल निघून आणि एनर्जी राहिल टिकून.

ठळक मुद्दे भुजंगासनामुळे शरीर लवचिक होतं.ताडासनाने पाठीशी संबंधित विकार दूर होतात.सुखासन केल्यानं मन ताजतवानं होतं. 

 हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दिवसभर सुस्त वाटतं. आळस जातंच नाही.  काहीजणांच्य बाबतीत तर ही अवस्था कोणत्याही ऋतूत कायम असते. सुस्त- आळसावलेलं शरीर आणि मन यातून बाहेर पडण्यासाठी योग साधनेतील तीन आसनं मदत करतात. ही तीन आसनं रोज केल्यास शरीर आणि मनाला मिळणारा ताजेपणा दिवसभर टिकून राहातो. तीन आसनांच्या मदतीनं केवळ शरीराला ऊर्जा मिळते असं नाही तर मेंदूला देखील ऊर्जा आणि चालना मिळते. आपल्या मेंदूची ताकद वाढवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात भुजंगासन, ताडासन आणि सुखासन ही तीन आसनं महत्त्वाची ठरतात. ती शास्त्रोक्त पध्दतीने केल्यास त्याचा फायदा लगेच मिळतो. 

Image: Google

1. भुजंगासन

भुजंगासन करताना सर्वात आधी जमिनीवर पालथं झोपावं. दोन्ही हाताच्या तळवे खांद्याच्या रेषेत जमिनीवर ठेवावेत. पोटाच्या खालच्या भागापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीर जमिनीला टेकलेलं असावं.  तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. मग छातीकडचा भाग उचलून् मान वर ताठ करावी. नजर छताकडे ठेवावी. छातीपासून् पोटापर्यंतचा भाग ताणलेला असावा. दोन्ही हात ताठ असावेत. ते कोपरात वाकलेले नको. श्वास रोखलेला हवा.  एक मिनिट या आसनात राहिलं की श्वास सोडत  हात कोपरात वाकवून आधी छाती जमिनीला टेकवावी आणि मग कपाळ जमिनीवर टेकवावं. या आसनामुळे शरीर लवचिक होतं. पोटावरची चरबी कमी होते. 

Image: Google

2. ताडासन

ताडासन करताना सर्वात आधी ताठ उभं राहावं. टाचा थोड्या वर उचलाव्यात. दोन्ही हात कमरेच्या रेषेत डोक्याच्या वर सरळ वर न्यावेत. दोन्ही हात ताठ ठेवत तळवे एकमेकांना जोडत नमस्कार स्थितीत आणावेत.  हे आसन करताना मान ताठ ठेवावी.  नजर समोर ठेवावी. टाचा आणखी वर न्याव्यात. या आसनात संपूर्ण भार पायांच्या पंज्यावर पडतो. पोट आत घेऊन या स्थितीत किमान एक मिनिट शरीराचा तोल सांभाळावा. मग श्वास सोडत आधी टाचा टेकवाव्यात. हाताची नमस्कार स्थिती सोडत हात खाली सरळ आणावेत.  या आसनामुळे पाठीचा मणका ताणला जातो. पाठीशी संबंधित विकार या आसनाच्या नियमित सरावाने दूर होतात.

Image: Google

3. सुखासन

सुखासन हे सर्वात शेवटी करावं. यासाठी जमिनीवर चादर किंवा योग मॅट घालून त्यावर  मांडी घालून / अर्ध पद्मासन किंवा पूर्ण पद्मासन घालून बसावं. दोन्ही हात गुडघ्यावर ओमकार अवस्थेत ठेवावेत. या आसनात पाठीचा कणा ताठ ठेवावा. डोळे बंद करुन शरीर सैल सोडावं. या आसनात कमीत कमी 10 मिनिटं डोळे मिटून चित्त एकाग्र करुन  बसावं. हे आसन करताना मंद श्वसन करावं. हे आसन शरीरावर आणि मनावर आलेला ताण घालवतो . हे आसन केल्यानंतर मनाला शांती मिळतेच सोबतच ऊर्जाही मिळते. 

टॅग्स :फिटनेस टिप्समानसिक आरोग्यआरोग्य