सकाळी झोपेतून उठल्यानंतर काहीवेळा आपली झोप पूर्ण होत नाही, सुस्तपणा किंवा थकवा वाटतो. आपल्या शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही किंवा आपण चुकीच्या पोझिशनमध्ये झोपतो तसेच झोप कमी लागणे यांसारख्या अनेक समस्यांमुळे झोपून उठले तरी फ्रेश वाटत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने शरीर अॅक्टिव्ह होते. यामुळे शरीरातील थकवा आणि सुस्ती देखील निघून जाते. आपल्यापैकी बरेचजण आज एक्सरसाइज सुरु करु असे ठरवून एक एक दिवस पुढे ढकलत नेतात. यामुळे तर आज करु, उद्या करु असे म्हणत एक्सरसाइज करण्याची वेळ पुढे ढकलली जाते, आणि ही वेळ कायम पुढे - पुढेच जात राहते. यासाठी जर आपल्याकडे एक्सरसाइज करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर आपण सकाळी उठल्या उठल्या अंथरुणात काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज देखील करु शकता. एक्सरसाइजसाठी वेळ नसलेल्यांनी किमान स्ट्रेचिंग एक्सरसाइज केले तरी खूप आहे. एक्सरसाइजसाठी वेळ नसेल तर हे ५ स्ट्रेचिंग एक्सरसाइज नक्की कराच(start your day with these 5 stretches).
yogawithkamya_ या इंस्टाग्राम पेजवरुन मॉर्निंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज कोणते आहेत आणि ते कसे करावेत याबद्दलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सकाळची सुरुवात कोणत्या ५ प्रकारच्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजने करावी, हे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे व्यायाम प्रकार तुम्हाला झोपेतून जाग आल्यावर लगेचच करायचे आहेत. यासाठी उठा, योगा मॅट किंवा सतरंजी शोधा, ती टाका... अशी काहीही कटकट करावी लागत नाही. आपल्याला जाग आल्यावर लगेचच ५ मिनिटांत आपण हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करु शकतो(5 Simple Stretches to Kick-Start Your Day).
मॉर्निंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज...
१. सीटेड साईड बेंडिंग :- हे आसन तुम्ही बेडवर किंवा सोफ्यावर बसूनही करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा एक हात वर करून श्वास घ्यावा लागेल. या दरम्यान तुमचा दुसरा हात खालच्या दिशेने असावा. आता हात खाली आणताना श्वास सोडा. असे ४ ते ५ वेळा करा.
२. फोर स्ट्रेच :- या स्ट्रेचिंगसाठी बेडवर सरळ बसा. आता एक पाय उचलून मांडीवर आडवा ठेवा. आता श्वास घेताना पुढे वाकवा. तुम्हाला हे स्ट्रेचिंग किमान ५ ते १० वेळा करावे लागेल. स्ट्रेचिंग करताना, श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. ही स्थिती कायम ठेवा आणि श्वास घेत राहा.
३. सीटेड कॅट काऊ पोझ :- सर्वातआधी बेडवर आरामात बसा. त्यानंतर दोन्ही पायांत थोडे अंतर ठेवा. आता आपल्या हाताचे दोन्ही तळवे दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर ठेवून हात ताठ सरळ रेषेत ठेवून घ्यावे. आता पाठीला थोडासा बाक देत हलकेच खाली वाका त्यानंतर छातीचा भाग थोडा स्ट्रेच करत खांदे मागे घ्या. आता मागे वाकताना श्वास सोडा. या स्ट्रेचिंगला सिटिंग कॅट अँड काऊ पोज म्हणतात. हे आसन केल्याने तुमचा थकवा कमी होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल.
४. बेडसाइड स्ट्रेचिंग :- बेडसाइड स्ट्रेचिंग करण्यासाठी बेडच्या एका बाजूला सरळ उभे राहा. आता हलकेच खाली वाकत आपल्या दोन्ही हातांनी बेडची एक बाजू धरा. त्यानंतर आपले संपूर्ण शरीर हातांवर जोर देत मागे स्ट्रेच करत राहा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडण्यास सुरुवात करा. तुम्हाला हे ४ ते ५ वेळा करावे लागेल यामुळे तुमचे संपूर्ण शरीर अॅक्टिव्ह होईल.
५. फुल बॉडी स्ट्रेचिंग :- फुल बॉडी स्ट्रेचिंग हे संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे उंची वाढते आणि संपूर्ण शरीराला आरामही मिळतो. यासाठी तुम्हाला एका जागी सरळ उभे राहावे लागेल. आता आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवून दोन्ही हात वर करत आपल्या डोक्यावर घ्या. दोन्ही हात डोक्यांवर घेताना या दरम्यान तुम्हाला पायांच्या बोटांखालील तळपायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शरीराला शक्य तितके स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा.