वृषाली जोशी-ढोके
एकदम एखादी बातमी येते आणि काहीसा धक्का बसतो. नाशकातली अलीकडचीच एक बातमी, प्राणायाम करता करता महिला कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्या महिलेला न्यूमोनिया आणि अन्य काही आजार होते, त्याकडे दूर्लक्ष झालं असावं. विषय त्या दुर्देवी घटनेच्या निमित्ताने असला तरी प्राणायाम करताना, श्वसनाचे व्यायाम करताना खबरदारी घ्यायलाच हवी. आपल्या मनानेच यूट्यूब पाहून वाट्टेल ते श्वसन प्रयोग आणि प्राणायाम करणं योग्य नाही. त्यासाठी अभ्यास हवा, प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तीकडूनच प्राणायाम शिकायला हवा.आज काल वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहे. तो ताण स्वतः कडून वाढलेल्या अपेक्षांचा असू शकतो किंवा बाहेर असलेल्या स्पर्धेचा असू शकतो. हा ताण जर नीट हाताळू शकलो नाही तर मग आहेच नैराश्य, व्यसनाधीनता, पळपुटेपणा आणि क्वचित आत्महत्याही. स्ट्रेसची चर्चा तर जेव्हा जेव्हा होते तेव्हा सगळेच एकमेकांना सांगतात, की प्राणायाम करा, ध्यान करा. पण प्राणायाम, ध्यान जर योग्य पद्धतीने केले नाही तर आपलेच "ध्यान" होऊन बसते.
(Image : Google)
प्राणायाम म्हंटले की लगेच सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा येते ती म्हणजे नाकपुड्या बंद करायच्या आणि जोरात श्वासोच्छ्वास करायचा. पण त्या आधी आपल्याला आपल्या श्वसन मार्गाची जुजबी माहिती, प्राणायाम म्हणजे काय, आपण तो का करतो, त्याचे प्रकार किती, ह्या सगळ्याचा फायदा काय हे सगळं माहीत करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणायाम या शब्दातच "प्राण" आहे म्हणजेच श्वास. आणि श्वास म्हणजेच जीवन, कारण श्वास संपला की आयुष्य संपतं. प्राणायाम हा शब्द प्राण + आयाम = प्राणायाम असा तयार झाला आहे. प्राण म्हणजे आत्मशक्ती किंवा चैतन्य जे शरीरात वास करते. शरीरातील जीव जगवण्यासाठी हवा आत ओढून घेतली जाते ती हवा प्राणा मध्ये खेचून घेतली जाते आणि नंतर उरलेली निरुपयोगी हवा उच्छवासाद्वारे बाहेर टाकली जाते. म्हणजेच काय तर प्राणायामाचा अभ्यास करताना आपल्याला आपल्या स्वतःच्या श्वास -उच्छवासावर जवळून लक्ष द्यायचे आहे.
(Image : Google)
प्राणायामाच्या अभ्यासाचे दोन भाग होतात.
१. कुंभक सहित प्राणायाम२. कुंभक विरहित प्राणायाम.कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. हा श्वास रोखत असताना बंध बांधले जातात. मुलबंध, उडीयान बंध आणि जालंधर बंध. हे बंध बांधून जेव्हा श्वास रोखून धरला जातो तेव्हा शरीरातल्या अनेक नाड्या/शिरा यांच्यावर धन आणि ऋण प्रभार निर्माण होतात आणि श्वसनसंस्थे वर दाब निर्माण होतो. त्यामुळे प्राणायामाचे चांगले फायदे आपल्याला मिळतात. कुंभक विरहित प्राणायामाचा अभ्यास करताना आधी जलद आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे तेव्हाच प्राणायामाचा अभ्यास चांगला होणार आहे. जेव्हा आपण कोणताही प्राणायाम करत असतो तेव्हा खालील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
(Image : Google)
काळजी काय घ्याल?
१. आपण कोणता प्राणायाम करत आहोत म्हणजेच बंध बांधून कुंभकासहित की विरहित?२. प्राणायामयांचा अभ्यास करण्याआधी साधारण तीन तास आधी जेवण झालेले असले पाहिजे. आणि प्राणायामच्या अभ्यासानंतर साधारण दीड तासाने घन पदार्थ सेवन करू शकतो.३. बंध बांधताना आणि सोडताना योग्य प्रकारेच बंध बांधले आणि सोडले गेले पाहिजे. त्या साठी तज्ज्ञ योग शिक्षकाच्यामार्गदर्शनाखालीच याचा अभ्यास करणेच योग्य.४. श्वास घेणे आणि सोडणे हे सुध्दा ठराविक कालावधीत संथ सावकाश आणि लयबध्द असावे अन्यथा त्याचे विपरीत परिणाम जाणवतात.५.प्राणायाम करण्याआधी आपल्या शारीरिक तक्रारी आपल्या योग शिक्षकाला स्पष्टपणे सांगणे हिताचे.६. प्राणायामाचा अभ्यास करण्याआधी आसनांचा अभ्यास किंवा हलका व्यायाम करणे महत्त्वाचे आहे७. आधी सोपे श्वसनाचे प्रकार शिकून मग प्रणायमाकडे वळणे योग्य. बरेचदा चुकीचा प्राणायाम केल्याने डोकेदुखी, अपचन, छातीत दुखणे, रक्तदाब वाढणे असे अनेक विकार मागे लागू शकतात. त्यामुळे घाबरून न जाता योग्य पद्धतीने प्राणायाम केला तर नक्कीच फायदेशीर ठरेल कारण जान है तो जहाँ है!
(लेखिका 'आयुष'मान्य योगाभ्यास-वेलनेस ट्रेनर आहेत.)