शीर्षासन हे योगाभ्यासातील फार सोपं आसन मानलं जातं. मात्र ते करायला तितकंच कठीण असं आसन आहे. ह्या आसनाचा सराव करण्यासाठी डोकं जमिनीवर टेकवून पूर्ण शरीराचा तोल साधता येणं आवश्यक आहे. हा तोल फार महत्त्वाचा आहे. तो नसल्यास ह्या आसनाचा सराव करणं कठीण आहे. खूप लोकांना वाटत असतं की त्यांना शीर्षासन करायला जमणारच नाही आणि निव्वळ ह्याच कारणामुळे ते हे आसन करत नाहीत. पण वस्तुस्थिती अशी नाही. थोड्याश्या सरावाने आपण हे आसन अगदी आरामात करू शकतो. हे आसन केल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. सुरुवातीला आसनाचा सराव करताना कुठ्ल्याही भिंतीचा आधार घेऊन किंवा कुठल्याही आधाराविना करावं आणि अगदी रोजच्या रोज नेमाने करावं असं उत्तम आसन आहे. आपण हे आसन करण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेऊयात(8 steps of getting into headstand (Shirshasana).
योग्य पद्धतीने ८ स्टेप्स मध्ये शीर्षासन कसे करावे ?
१. सर्वप्रथम गुडघ्यांवर येऊन वज्रासनात बसावं. २. संपूर्ण हात व हाताचे कोपरे मॅटला स्पर्श करतील असे गुडघ्याच्या सरळ रेषेत ठेवा. ३. आता आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांत इंटरलॉक करून ते मॅटवर ठेवावेत.४. हाताची बोटं इंटरलॉक केल्यानंतर तळव्यांना एका वाटीचा आकार द्यावा आणि सावकाशपणे आपलं डोकं झुकवून हातांच्या तळव्यांवर ठेवावं. ५. यानंतर सावकाश आपले दोन्ही पाय गुढघ्यात वाकवून वर उचलण्याचा प्रयत्न करावा. ६. या दरम्यान खालपासून ते वरपर्यंत शरीर एकदम सरळ असलं पाहिजे. शरीराचा तोल नीट सांभाळावा.७. यानंतर हळुहळु पाय वर नेत आकाशाच्या दिशेने एकदम सरळ करावे.८. ह्या स्थितीत आल्यानंतर १५ ते २० सेकंद दीर्घश्वसन करावं आणि आहे त्या स्थितीत तसंच राहावं. आता सावकाशपणे श्वास सोडत पाय जमिनीवर अलगद आणावेत.
yoga_with_uma या इंस्टाग्राम पेजवरून ८ सोप्या स्टेप्स वापरून शीर्षासन कसे करता येईल याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून शीर्षासन करणे होईल सुखकर.
शीर्षासन करण्याचे फायदे -
१. शरीराचं संतुलन वाढवण्यात मदत - शीर्षासन करताना पुन्हा पुन्हा खाली न पडता चांगल्या प्रकारे तोल सांभाळता आला की आपली संतुलन क्षमता वाढीस लागते.
२. मूड प्रसन्न करते - शीर्षासन केल्यामुळे आपल्या मस्तकातील रक्तप्रवाह वेगाने वाढतो आणि यामुळे आपल्याला अगदी शांत वाटतं. मनावरचा सगळा ताण-तणाव दूर होतो.
३. मेंदूसाठी उपयोग - शीर्षासन केल्याने मेंदूला फार उत्तम व्यायाम मिळतो. मेंदूच्या आरोग्यासाठी हा एक चांगला योगाभ्यास आहे.
४. पचनक्रिया सुधारते - हे आसन रोज केल्याने पचन क्रियेवर चांगला परिणाम झालेला दिसून येतो. बद्धकोष्ठ, अजीर्ण आणि इतर तक्रारींपासून शीर्षासन नियमितपणे केल्याने सुटका मिळते.
५. डोकेदुखी आणि अर्धशिशी (मायग्रेन) रोखण्यासाठी उपयुक्त - शीर्षासन दैनंदिन जगण्याचा भाग केल्यास डोकेदुखी आणि मायग्रेनच्या तक्रारीपासून कायमची सुटका मिळते.