व्यायाम करण्याचा उद्देश हा फक्त वजन कमी करणं एवढाच नसतो. आपलं शरीर आखीव रेखीव होणं हाही व्यायामाचा उद्देश आहे. स्नायुंना जेव्हा रेखीवपणा येतो तेव्हाच शरीरही बांधेसूद दिसतं. व्यायामातून दिवसभराची ऊर्जा, उत्साह आणि ताकदही मिळवायची असते. आरोग्य निरोगी ठेवून आनंदी आणि उत्साही राहाण्याचा मार्ग व्यायामातून सापडावा हा उद्देश व्यायाम करण्यामागे असतो. हे सर्व उद्देश पूर्ण करणारा व्यायाम म्हणजे झुम्बा आहे. व्यायामाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे मिळवण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा झुम्बा करणं आवश्यक असल्याचं फिटनेस तज्ज्ञ सांगतात. झुम्बा हा नृत्य स्वरुपातला व्यायाम असून तो सुरु केल्यावर काही आठवड्यातच आपल्या शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. केवळ वजन कमी होणंच नाही तर आरोग्याचे इतर महत्त्वाचे फायदेही या झुम्बा व्यायाम प्रकारातून मिळवता येतात.
Image: Google
झुम्बा व्यायामाचे फायदे
1. झुम्बा करताना शरीर वेगाने हालचाली करतं. याचा परिणाम स्नायुंमधला रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू मजबूत होतात. म्हणूनच झुम्बाचे परिणाम काही आठवड्यातच दिसून येतात.
2. झुम्बा हा नृत्यस्वरुपातला व्यायाम प्रकार आहे. या व्यायामातून आनंदी करणारं सेरोटोनिन हे हार्मोन स्त्रवण्यास मदत होते. झुम्बा व्यायामानं मूड सुधारतो. मूड सुधारला की शरीर मनावरचा तणावही कमी होतो.
Image: Google
3. झुम्बा व्यायाम केल्यानं शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. झुम्बा व्यायामानं रक्तवाहिन्यांचं काम सुधारतं. रक्तदाबासारख्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचा धोक टळतो.
4. अर्धा ते पाऊण तासाचा झुम्बा व्यायाम करताना शरीरातील सर्व स्नायू सक्रीय असतात. यामुळे हदयाची गती वाढते. झुम्बा व्यायाम प्रकारानं हदयाचं आरोग्य सुधारतं . झुम्बाला कार्डियो वर्कआउट असं म्हटलं जात्ं. 45 मिनिटांचा झुम्बा व्यायाम केल्यानं 370 उष्मांक ( कॅलरीज) जळतात.
Image: Google
इफेक्टिव्ह व्यायामाचे रुल्स मात्र सोपे!
1. झुम्बा व्यायाम करताना सहज हालचाली होतील असे कपडे घालावेत. कपडे टाइट फिट नसावेत. जास्त वजनाचे नसावेत. घाम शोषणारे कपडे असावेत. कारण झुम्बातल्या गतीशील हालचालींनी घाम जास्त येतो.
2. पायात डान्सिंग शूज असावेत.
Image: Google
3. झुम्बा करण्यासाठी शरीराची तेवढी ताकद , क्षमता आणि सहनशिलताही असावी लागते. त्यामुळे रोज झुम्बा करणं टाळावं. एक दिवसाआड पाऊण तास झुम्बा करावा. जसा झुम्बा व्यायाम प्रकार अंगवळणी पडतो तसा तो करण्याची क्षमता शरीरात विकसित होते.
4. झुम्बा रिकाम्या पोटी करु नये. तो करण्याआधी एखादं फळ किंवा थोडा सुकामेवा खावा.
Image: Google
5. दुपारी जेवणानंतर झुम्बा करणार असाल तर जेवण आणि झुम्बा यात दोन तासांचं अंतर असावं.
6. झुम्बा करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यावं.
7. झुम्बा करताना सोबत पाण्याची बाटली आणि रुमाल बाळगावा.