Lokmat Sakhi >Fitness > फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात..

फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात..

पार्किन्सन हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. मग यात फिजिओथेरपी कशी काय मदत करते हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आज या लेखातून हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 06:40 PM2021-06-16T18:40:57+5:302021-06-16T18:50:28+5:30

पार्किन्सन हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. मग यात फिजिओथेरपी कशी काय मदत करते हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आज या लेखातून हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

Does Physiotherapy Reduce Parkinson's Disorders? If the right measures are taken, the stages of the disease will be prolonged. | फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात..

फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात..

डॉ. देविका गद्रे

पार्किन्सन हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. मग यात फिजिओथेरपी कशी काय मदत करते
हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आज या लेखातून हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.
रुग्णामधील पार्किन्सनच्या लक्षणांना काही टप्प्यांमध्ये विभागलं जाऊ शकतं. फिजिओथेरपीने आपण हे
टप्पे लांबवू शकतो. म्हणजेच जर रुग्ण रोगाच्या पहिल्या टप्प्यात असेल तर त्याचा पहिल्या ते दुसऱ्या
टप्प्यामधल्या अंतराचा प्रवास लांबवता येऊ शकतो. नियमित व्यायाम व इतर काही गोष्टींच्या मदतीने या रुग्णांचं
आयुष्य सुकर होऊ शकतं.

फिजिओथेरपीच्या पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धती व व्यायाम प्रकार


१) ताकदीसाठी व्यायाम: हातापायांमध्ये योग्य ताकद असणं अतिशय महत्वाचं असतं. त्यासाठी वजन व थेराबॅंडचा वापर करून काही व्यायाम केले जातात. तसेच हे व्यायामप्रकार काही वेळा झोपून, बसून अथवा उभे राहून करता येऊ शकतात. यासाठी रुग्णाच्या लक्षणांचा टप्पा लक्षात घेणे महत्वाचे ठरते.
२) श्वासाचे व्यायाम: हातापायातील स्नायूंप्रमाणेच आपल्या बरगडयांमध्येही स्नायू असतात. हे स्नायू आपल्याला
श्वासोच्छवासासाठी मदत करतात. म्हणूनच ह्यांची ताकद वाढवून त्यांना बळकट करणे गरजेचे असते. ह्यामुळे
शरीरात जास्तीत जास्त प्राणवायू सामावून घेता येऊ शकतो.

३) तोल सांभाळण्यासाठीचे व्यायाम: कंपवाताचे रुग्ण बऱ्याचदा तोल जात असल्याची तक्रार करतात. यासाठी काही वेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. जसे की एका पायावर उभे राहणे, दोन्ही पाय जवळ घेऊन डोळे बंद करून उभे राहणे इत्यादी.
४) बोटांच्या स्नायूंचे व्यायाम: कंपवातात रुग्णाचे हात थरथरत असल्याचे दिसून येते. ह्यासाठी काही खेळ खेळता
येऊ शकतात. जसे की दोऱ्यात मणी ओवणे, वेगवेगळ्या आकाराच्या चेंडूंचा झेल घेणे इत्यादी. यामुळे हाताच्या
बोटात असलेले छोटे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते.
५) चालण्याचे व्यायाम: कंपवातात पाय अगदी एकमेकांजवळ टाकून चालले जाते. यासाठी जर योग्य प्रकारे
चालण्याचे व्यायाम केले तर हे लक्षण कमी होऊ शकते. दोन पावलांमद्धे योग्य अंतर घेतले जावे ह्यासाठी चालतांना काही खुणा केल्या जातात. त्या खुणांवर पाय टाकत चालण्याचा व्यायाम रुग्णाला सांगितलं जातो. याप्रकारचे अनेक व्यायाम असतात.
जसजसा काळ बदलत गेला त्याप्रमाणे फिजिओथेरपीमध्ये सुद्धा नवीन नवीन गोष्टींचा समावेश होत गेला. जुन्या
पद्धती वापरात असतांना नवीन गोष्टींची सुरुवात करणे रुग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरते.

 

 

त्यापैकी काही पद्धती व उपाययोजना..

१) हायड्रोथेरेपी: म्हणजेच पाण्याचा वापर करून दिले जाणारे व्यायाम. पाण्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. जसे की पाण्यात उभे राहिल्यावर आपल्याला आपले वजन जाणवत नाही. यामुळे व्यायाम करणे सुकर जाते. मात्र यासाठी काही विशिष्ट प्रकारचेच स्विमिंग पूल्स लागतात. रुग्णाला वजन न जाणवल्यामुळे मात्र जे व्यायाम जमिनीवर करता येत नाही ते सर्व पाण्यात करणे शक्य होते. हल्ली अनेक देशात ही पद्धत प्रसिद्ध झाली आहे व त्याचा गुणही रुग्णांना येत आहे.
२) Functional Training: म्हणजेच आपल्या जीवनातील रोजच्या क्रिया सोप्या व्हाव्यात यासाठी काही
उपाययोजना सांगितल्या जातात. जसे की रुग्णाला शर्ट घालणे कठीण जात असेल तर काय करावे? यासाठी एक
ओढणी घेतली जाते व दोन्ही बाजूंना गाठ मारून त्याचा एक गोल बनवला जातो. जर रुग्णाचा डावा हात कमी
ताकदीचा असेल तर तो हात त्या गोलात आधी घातला जातो व नंतर उजवा हात घातला जातो. मात्र काढताना उजवा हात आधी व नंतर डावा हात काढला जातो. अश्या अनेक युक्त्या शिकवल्या जातात.
३) Environmental Modifications: म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गोष्टींना रुग्णाच्या सोयीनुसार व
गरजेनुसार बदलणे. जसे की तोल जात असल्यामुळे घरात ठिकठिकाणी ग्रब बार्स व रेलिंगचा वापर करणे जेणे करून रुजला पटकन आसपास धरता येऊ शकते. तसेच न घसरणाऱ्या फरशांचा वापर करणे, रुग्णाला दिसण्यास त्रास होऊ नये म्हणून घरात व्यवस्थित प्रकाश येईल ह्याची व्यवस्था करणे इत्यादी. ह्या गोष्टी जरी दिसताना छोट्या दिसल्या तरीही अतिशय महत्वाच्या ठरतात व अशा अनेक गोष्टींसाठी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट नक्कीच मदत करू शकतात.
४) ग्रुपमध्ये केले जाऊ शकणारे व्यायाम: फिजिओथेरपिस्टच्या क्लिनिकमद्धे गेल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या इतर
पार्किन्सनच्या रुग्णांशी तुमची भेट घडवून देऊ शकतात तसेच पार्किन्सनच्या सर्व रुग्णांसाठी एकत्र व्यायामाचे
सेशनसुद्धा घेऊ शकतात. ह्यामुळे आपण एकटे नाही ही भावना रुग्णाला मानसिक आधार देते. आपल्यासारखे
इतरही लोक आहेत हे समजते. तसेच आपल्या आजाराची लक्षणे एकमेकांना सांगितली जातात व दुसरे रुग्ण
ह्यासाठी काय उपचार घेतात वा कोणत्या उपाययोजना करतात हे सुद्धा समजते. यामुळे आत्मविश्वास दृढ
व्हायला मदत होते.
५) समुपदेशन: रुग्णाचे व नातेवाईकांचे समुपदेशन अत्यंत महत्वाचे ठरते. यासाठी समुपदेशक तुम्हाला आजाराचे स्वरूप, गांभीर्य, त्यात पुढे कोणती लक्षणे दिसू शकतात ह्याबद्दल माहिती देतात. तसेच घाबरून न जाण्यासाठी काय काय करता येईल ह्याबद्दलही मार्गदर्शन करतात. घरातल्या इतर लोकांना कशी व कोणती काळजी घ्याल यासाठी सल्ला दिला जातो. अशा अनेक प्रकारांनी मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
यासारख्या उपायांनी रुग्णाला शक्य तितका आजाराचा टप्पा लांबवता येऊ शकतो. वर दिलेले उपाय थोडक्यात
सांगितलेले आहेत. योग्य फिजिओथेरपीस्टचा सल्ला अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वा
ओळखीच्या कंपवाताच्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन घेण्यासाठी नक्की मदत करा व ह्या रुग्णांचे आयुष्य सुखकर करा.

 

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/

Web Title: Does Physiotherapy Reduce Parkinson's Disorders? If the right measures are taken, the stages of the disease will be prolonged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य