Walking Backward : निरोगी आणि फिट जीवन जगण्यासाठी आरोग्याची भरपूर काळजी घेण्याची गरज असते. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारापासून ते जीवनशैली या सगळ्यात बदल करावा लागतो. हे केल्यानंतरही तुम्ही हेल्दी तेव्हाच म्हटले जाल, जेव्हा तुमची हाडं मजबूत असतील. जर हाडं कमजोर झाली तर तुमची दिनचर्या प्रभावित होईल. सोबतच आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतील. अशात तुम्ही चांगलं जीवन जगायचं असेल तर हाडं मजबूत असणं गरजेचं आहे.
हाडं मजबूत ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण लोकांमध्ये एक अशीही धारणा आहे की, उलटं चालल्यानं हाडं मजबूत होतात. अशात बरेच लोक हाडं मजबूत करण्यासाठी उलटं चालतात. पण असं करणं खरंच फायदेशीर असतं का? खरंच उलटं चालल्यानं हाडं मजबूत होतात का? असा प्रश्न आहे. अशात हाडांच्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर सुजॉय भट्टाचार्य यांनी 'आजतक'ला याबाबत माहिती दिली.
असं मानलं जातं की, उलटं चालल्यानं जॉइंट्समधील हाडांवर दबाव कमी पडतो आणि हाडांना गति मिळते. ज्यामुळे ती मजबूत होतात. मात्र, डॉक्टर सुजॉय भट्टाचार्य यांनी हा केवळ एक गैरसमज असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 'आजकाल काहीही फॅशन बनते. जे लोक म्हणतात की, उलटं चालल्यास हाडं मजबूत होतात, ते खोटं आहे. याला काहीच वैज्ञानिक आधार नाहीये. हाडं मजबूत करण्यासाठी उलटं चालण्याची गरज नाही'.
डॉ. सुजॉय भट्टाचार्य म्हणाले की, हाडं मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यासाठी रोज कमीत कमी ३० मिनिटं कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करावी. ही केल्यास हाडंही मजबूत होतात आणि आरोग्यही चांगलं राहतं. भरभर चालणं, सायकल चालवणं, स्वीमिंग करणं किंवा जॉगिंग अशा अॅक्टिविटी तुम्ही करू शकता. तुम्ही अशा अॅक्टिविटी करा ज्याव्दारे हाडांमध्ये मुव्हमेंट होईल आणि घाम येईल.
जर तुम्हाला तासंतास एका जागी बसून काम करावं लागत असेल तर दर एक तासानं दोन ते चार मिनिटांसाठी जागेवरून उभे रहा. बॉडी स्ट्रेच करा. हाडं मजबूत करण्यासाठी पोटावरील चरबी कमी करणं गरजेचं असतं. जास्त वजन असेल तर हाडांवर दबाव पडतो, ज्यामुळे हाडं कमजोर होतात.