Join us

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही! जाणून घ्या, विज्ञान काय म्हणतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:55 IST

आरोग्य आणि फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा असू शकतो, परंतु फक्त त्यावर अवलंबून राहणं हे वजन कमी करण्यासाठी आपल्याला वाटतं तितकं प्रभावी ठरू शकत नाही.

जर तुम्हाला वाटत असेल की, जिममध्ये जाणं हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, तर तुम्हाला तुमच्या विचारांवर पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य आणि फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा असू शकतो, परंतु फक्त त्यावर अवलंबून राहणं हे वजन कमी करण्यासाठी आपल्याला वाटतं तितकं प्रभावी ठरू शकत नाही.

२०१२ मध्ये केलेल्या अभ्यासात, संशोधक हर्मन पॉन्ट्झर यांनी टांझानियाच्या हदजा जमातीच्या मेटाबॉलिज्मवर संशोधन केलं. या जमातीचे लोक दिवसभर चालणे, धावणे, सामान उचलणे आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये व्यस्त असतात. पॉन्ट्झर यांना त्याच्या कॅलरी बर्नची लेव्हल ही सरासरी ऑफिस कर्मचाऱ्यांपेक्षा खूप जास्त असण्याची अपेक्षा होती. पण परिणाम आश्चर्यकारक होते. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, हदजा जमातीतील लोकांना लागणारी (जे दिवसभर शारीरिकरित्या सक्रिय असतात) दैनंदिन उर्जेची गरज ही अमेरिकेतील ऑफिस वर्कर यांच्या समान आहे. 

या आश्चर्यकारक परिणामांनी पॉन्ट्झर यांना कॅलरी बर्निंगबद्दल नवीन सिद्धांत विकसित करण्यास प्रेरित केलं. या सिद्धांताला 'Constrained Total Energy Expenditure Model' असं म्हणतात. हे मॉडेल सूचित करतं की, आपलं शरीर आणि मेंदू आवश्यकतेनुसार काही बायोलॉजिकल प्रोसेस कमी करून किंवा थांबवून बर्न झालेल्या कॅलरीजची संख्या लिमिटमध्ये ठेवतात. पॉन्ट्झर यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही अशा लोकांचा अभ्यास केला जे खूप सक्रिय आहेत आणि जे लोक खूप बैठे जीवन जगतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही गट जवळपास सारख्याच कॅलरीज बर्न करतात.

केवळ व्यायामावर अवलंबून राहून वजन कमी करणं कठीण होऊ शकतं, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोग टाळण्यासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. पण वजन कमी करण्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि स्ट्रेस कंट्रोल या घटकांनाही प्राधान्य द्यायला हवं. त्यामुळे फिट आणि निरोगी राहण्यासाठी संपूर्ण जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. फक्त जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याची अपेक्षा केल्यास पूर्ण परिणाम दिसू शकत नाहीत. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य