नखांवरुन आरोग्य तपासण्याची आपली जुनी पद्धत आहे. पुढे मोठं झालं का हीच नखं सुंदर दिसण्यासाठी आपले प्रयत्न सुरु होतात. नखं सुंदर करण्याच्या विविध पध्दती आणि साधनं आहेत. पण नखांच्या केवळ सौंदर्याचा विचार करुन चालत नाही. संपूर्ण शरीरासोबतच नखांचं आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं असतं. शरीरात कुठे काही खट्टू झालं की आपलं लक्ष तिकडे वेधलं जातं. थोडं जरी गंभीर काही असलं की आपण डॉक्टरांना दाखवतो, त्यांचा सल्ला घेतो. तसं आपलं आपल्या नखांकडे लक्ष असायला हवं. नखांचं आरोग्य आणि सौंदर्याचा विचार करता नखांना बुरशी या आजाराचा धोका असतो हे कायम लक्षात ठेवावं.
नखांना बुरशी... हा कोणता आजार? तो का होतो ?नखाच्या आत, बाहेर बुरशी वाढून नखांना बुरशी संसर्ग होतो. दमट आणि आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ झपाट्यानं होते. जांघेत येणारी खाज, नायटा यामुळे नखांना संसर्गाचा धोका निर्माण होतो,
बुरशी ही आपल्या शरीरात असतेच, आणि तिला वाढण्याचं कारण भेटलं की नखांना बुरशी यासारखे आजार होतात. हाताच्या बोटांच्या नखापेक्षा पायाच्या अंगठ्याच्या नखांना हा बुरशीजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. पायात घट्ट बूट, सॅण्डल घातली जात असेल तर पायाच्या अंगठ्याच्या नखांना हा आजार होण्याची शक्यता असते. नखांना बुरशी हा आजार एका व्यक्तीकडून दूसऱ्या व्यतीकडे पसरतो.
वेगवेगळ्या कारणांमुळे नखांना बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका असतो. मधुमेह असेल तर, रक्तप्रवाह नीट नसेल तर, कृत्रिम नखं लावण्याची सवय, सार्वजनिक तरण तलावात पोहोणे, नखांना इजा झालेली असल्यास, नखांच्या भोवतीच्या त्वचेला इजा झालेली असल्या, हात किंवा पाय जास्त काळ ओलसर राहाणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं , पायात घट्ट बूट घालणं, सलून किंवा पार्लरमधून मेनिक्यूअर वा पेडिक्यूअर करताना साधनं स्वक्छ आणि निर्जंतूक केलेली नसणं या अनेक कारणांंमुळे नखांना बुरशीचा संसर्ग होवू शकतो.नखांना बुरशीचा संसर्ग होतो तेव्हा.,
नखांना फंगल इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा त्याचं स्वरुप वेगवेगळं असतं. कोणाला नखाच्या काही भागालाच होतं, तर काहींना संपूर्ण नखाला होत तर काहींना एका पेक्षा अधिक नखांना होतं.नखांना बुरशीचा संसर्ग होतो तेव्हा नखं विचित्रं दिसतात. नखं ही मुळापासून उखडून आल्यासारखी दिसतात.- बुरशी संसर्ग झालेल्या नखातून वास येतो.- नखं ही कुरतड्यासारखी आणि जाडी भरडी दिसतात.
नखांना होणाऱ्या बुरशीचे प्रकार- डिस्टल सब्यूंग्यूअल इन्फेक्शन:- नखांना होणाऱ्या बुरशीजन्य आजारात डिस्टल संब्यूंग्यूअल इन्फेक्शन हे सर्वसाधारण आहे. अनेकजणांमधे ते आढळतं. हा बुरशीजन्य आजार हाताच्या बोटांच्या आणि पायाच्या अंगठ्याच्या नखाला होतो. या बुरशीचा जेव्हा संसर्ग होतो तेव्हा नखाच्या बाहेरची कडा ही पांढरी किंवा पिवळी दिसते. हा संसर्ग नखाच्या मुळावर आक्रमण करतो आणि मग नखाच्या आतील भागात पसरतो.
- व्हाइट सूपरफिशिअल इन्फेक्शन:- बुरशीचा हा प्रकार केवळ पायाच्या अंगठ्याच्या नखाला होतो. ही बुरशी नखाच्या सर्वात वरच्या थरावर आक्रमण करते. आणि सहज दिसतील असे पांढरे डाग नखाला पडतात. पांढरा डाग नखभर पसरतो. नखं हे खरबूडं होतं, सैल पडतं आणि नखांचा चुरा होण्याची शक्यता असते. नखांवरचे हे डाग मग खड्यांच्या आणि पोपड्यांच्या स्वरुपात रुपांतरित होतात.- प्रॉक्सिमल सब्यूंग्यूअल इन्फेक्शन:- हा बुरशीचा असामान्य असा प्रकार असून तो हाताच्या आणि पायाच्या अंगठाच्या नखांना होवू शकतो. नखाच्या मुळाशी पिवळे डाग दिसतात आणि मग ते वाढून नखांच्या वरच्या भागावर पसरतात. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते, त्यांना नखांना इजा होण्याच्या निमित्तानं हा आजार होतो- कॅन्डिडा इन्फेक्शन:- कॅन्डिडा यिस्ट या प्रकारचा हा संसर्ग आहे. जर नखाला आधी जखम झालेली असल्यास अशा नखांवर ही बुरशी हल्ला करते. या प्रकारचा बुरशी संसर्ग हा हाताच्या नखांना होतो. ज्यांचे हात सतत पाण्यात काम करुन ओले राहात असतील तर त्यांना हा बुरशी प्रकार होण्याची शक्यता असते. नखाच्या सुरुवातीला असलेली कातडी ही सुजते, लाल होते आणि हात लावलं तरी दुखते. नखाचा काही भाग किंवा संपूर्ण नखच मुळापासून उखडलं जातं.
निदान कसं? औषध काय?आपल्या नखामधे काही बदल दिसले तर ते नेलपॉलिशच्या सहाय्यानं लपवण्यापेक्षा अधी डॉक्टरांना दाखवा. डॉक्टर प्राथमिक तपासणी करतात. गरज असल्यास नखाचा, नखाच्या मुळाचा, नखाचा आजूबाजूच्या त्वचेचा काही भाग तपासणीसाठी काढतत. आणि त्याची सूक्ष्मदर्शीद्वारे तपासणी करुन नखाच्या बुरशीचं निदान करतात.नखाला झालेला बुरशी संसर्ग हा जर कमी असेल तर डॉक्टर नखांना वरुन लावायचं औषध, क्रीम , पावडर देतात. पण संसर्ग हा जर खूप असेल तर मग अॅण्टिफंगल गोळ्या औषधं देतात, या ट्रीटमेण्टमधे काही औषधं ही दिवसातून अनेकदा घ्यावी लागतात. तर काही औषधं आठवड्यातून एकदा घ्यावी लागतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं ही प्रिस्क्रिप्शन बरहुकूम घ्यावीत. ही औषधं चुकवू नये. बुरशी संसर्ग हा जर गंभीर स्वरुपाचा असेल तर शस्त्रक्रिया करुन नख काढूनही टाकावा लागतो.
नखांना बुरशी संसर्ग कसा रोखणार? जीवनशैली संंबंधित काही गोष्टींमधे, सवयींमधे जर बदल केला तर बुरशीला प्रतिबंध होवू शकतो. नखं ही नीटनेटकी कापलेली आणि स्वच्छ असावी, हा एक उपाय नखांचं बुरशीच्या धोक्यापासून रक्षण करतं- नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला इजा होवू देऊ नये. पाण्यात खूप काळ काम करायचं असल्यास हातात रबरी ग्लोव्हज घालावेत.- संसर्ग झालेल्या नखांना स्पर्श केल्यानंतर हात साबणानं स्वच्छ धुवावेत.- आंघोळीनंतर, हातपाय धुतल्यानंतर हात पाय व्यवस्थित कोरडे करावेत. विशेषत: पायाच्या अंगठयामधील भाग कोरडा असावा.- मेनिक्यूअर, पेडिक्यूअर करताना माहितीतल्या पार्लरमधे करावं. किंवा ते किट घरी आणून स्वत: करावं.- बाहेर अनवाणी पायांनी चालणं टाळावं.- नखं सजवण्यासाठी नखांवर कृत्रिम नखं लावणं किंवा सतत नेलपॉलिश लावणं टाळावं.- हाताच्या किंवा पायांच्या बोटांमधे जर सतत ओलसरपणा राहात असेल तर तिथे अॅण्टिफंगल स्प्रे किंवा पावडरचा वापर करावा.- आर्द्रता शोषून घेणारे सॉक्स वापरावेत.
नखांचा बुरशी संसर्ग बरा होतो का? अनेक जणांच्या बाबतीत नखांचा बुरशी संसर्ग बरं होण्यास अवघड असतं. त्यामुळे केवळ एकदा उपचार करुन भागत नाही. नखांचा बुरशी संसर्ग तेव्हाच बरा झालेला मानतात जेव्हा संसर्गरहित नखाची पूर्ण वाढ होते. एकदा बुरशी संसर्ग बरा झाल्यावर तो पुन्हा होऊ शकतो. अनेकदा हा संसर्ग इतका गंभीर होतो की नख पूर्णत: कामातून जातं. कधी कधी सर्जरी करुन ते काढावं लागतं. बुरशी संसर्गानं नखांचा रंग उडतो. कधी कधी नखाचा बुरशी संसर्ग शरीराच्या इतर भागात किंवा रक्त प्रवाहात पसरतो. नखांचा बुरशी संसर्ग बरा झाला तरी येणारं नवीन नख हे निरोगी दिसत नाही.