मेहनतीसाठी लागणारा स्टॅमिना वाढवणे आणि कोणतेही शारिरीक आव्हान पेलण्यासाठी शरीर मजबूत करणे, यासाठी अधिक तीव्र असा हा व्यायाम प्रकार आहे. एरोबिक्स, वेट लिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक या तीन व्यायाम प्रकारांना एकत्रित करून क्रॉसफिट वर्कऑऊट तयार होते. हेवी वर्कआऊट असणारा हा व्यायाम एक तासापेक्षाही कमी वेळेसाठी केला जातो. पण अधिकाधिक कॅलरीज यामध्ये बर्न होतात. शिवाय यामध्ये अतिशय जास्त शारिरीक कष्ट असल्याने बऱ्याचदा यातून इतरांना इजाही झालेली आहे. त्यामुळे अनेक जण क्रॉसफिट वर्कआऊट करणे सोडून देत आहेत.
याविषयी सांगताना औरंगाबाद येथील फिटनेस ट्रेनर रूपा बाबला म्हणाल्या की, कोणतेही मेकॅनिकल साहित्य न वापरता आपल्या बॉडीच्या मदतीने आपण जे वर्कआऊट करू शकतो, त्याला क्रॉसफिट म्हणतात. पुशअप्स करणे, उठाबशा करणे यातून आपण आपले शरीरच उचलत असतो. या व्यायाम प्रकारातून तुमचा स्टॅमिना बिल्टअप होत जातो आणि तो खूप वेळ टिकणारा असतो.फिटनेस ट्रेनर रूपा बाबला यांच्या मते 'युज ऑर लूज' हे आपल्या मसल्सचे तत्व असते. तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाईज केली, तर निश्चितच तुमचे शरीर त्यादृष्टीने तयार होत जाते. कोणताही व्यायाम प्रकार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले शरीर आणि आपले मन यांना त्यादृष्टीने तयार करण्यासाठी ५० ते ५५ दिवस द्यावे लागतात. एवढ्या दिवसांचा नियमित व्यायामच तुमच्या शरिराला तशी सवय लावू शकतो. त्यामुळे क्रॉसफिटच नाही, तर कोणताही व्यायामाचा प्रकार थांबवायचा असेल, तर तो हळूहळू थांबवा, असा सल्लाही रूपा यांनी दिला आहे.