आपण छान ‘शेप’मधे दिसावं असं प्रत्येक मुलीला आणि महिलेला वाटत असतं. कित्येकजणी नित्यनेमानं व्यायाम करुन स्वत:ला शेपमधे आणण्याचा प्रयत्नही करत असतात. पण व्यायाम करताना अशा काही चुका होतात ज्याचा परिणाम व्यायामावर होतो. आणि त्यामुळे व्यायामातून चांगले परिणाम दिसण्याऐवजी काही तोटे सहन करावे लागतात. अनेकजणी तर केवळ या तोट्यांमुळेही व्यायाम करायचं बंद करतात. खरंतर व्यायामाचा परिणाम चांगला होण्यासाठी व्यायाम करताना काय काय चुका होतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या चुका फक्त व्यायाम प्रकाराशीच संबंधित आहेत असं नसून व्यायामासाठीच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अनेक चुका होतात आणि त्याचा थेट परिणाम व्यायामावर होतो.
व्यायाम करताना काय चुका होतात?
- कॉटनचे कपडे घालून व्यायाम करणं ही गोष्ट चुकीची आहे. कॉटनचे कपडे हे एरवी वापरण्यास उत्तमच असतात. पण व्यायामाच्या वेळेस कॉटन ऐवजी घाम कपड्यांबाहेर काढून पटकन सुकणाऱ्या प्रकारचे कपडे वापरावेत. व्यायामाच्या वेळेस जर कॉटनचे कपडे वापरले तर ते अंगातला घाम शोषून ओले होतात. कपड्यातला ओलसरपणा पटकन सुकत नाही. घामाच्या कपड्यांचा त्रास मग त्वचेला जाणवतो.
- व्यायाम करताना व्यायामाचे कपडे परिधान करणं गरेजेचे असतात. कारण व्यायामादरम्यान होणाऱ्या हालचालींचा, त्यावेळेसच्या शारीरिक अवस्थेचा आणि मानसिकतेचा विचार करुन हे कपडे तयार केलेले असततात. मुलींनी, महिलांनी व्यायामाच्या वेळेस स्तनांच्या सुरक्षिततेसाठी स्पोर्टस ब्रा घालणं गरजेचं असतं. योग्य मापाच्या स्पोर्टस ब्रा न घालता व्यायाम केल्यास व्यायामादरम्यानच्या हालचालींमुळे स्तनांच्या पेशींना इजा होण्याची शक्यता असते. व्यायाम करताना किंवा झाल्यानंतर स्तन दुखण्याची समस्या अनेकींना जाणवते. त्यामागचं कारण म्हणजे स्पोर्टस ब्रा न घालता व्यायाम करणं हे असतं. व्यायामाच्या वेळेस योग्य प्रकारचे, योग्य मापाचे, व्यायाम करताना सुखकर वाटतील असे कपडे घालणं महत्त्वाचं असतं.
- रोज उठून एकच प्रकारचा व्यायाम करणं ही चूक अनेकजणी करतात. व्यायाम करताना वेग, वजन, प्रकार यात हळूहळू आणि थोडा बदल करणं, ते वाढवत नेणं गरजेचं असतं. तरच शरीरातील चरबी जळण्यास , स्नायू विकसित होण्यास मदत होते. तोच तोच व्यायाम केल्यानं नंतर व्यायामाचा कंटाळा येतो, त्यात आव्हानात्मक असं काही वाटेनासं होतं, नाविन्य राहात नाही, त्यामुळे व्यायाम करताना हालचालींमधे मरगळ येण्याची शक्यता असते.
- वेट किंवा स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे महिलांनी करणं गरजेचं असतं. पण वेट ट्रेनिंग केल्यास आपल्या शरीराला पूरुषी लूक येईल अशा गैरसमजूतीतून वेट ट्रेनिंग हा व्यायामातील महत्त्वाचा भाग करण्याचं टाळलं जातं. पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होत नाही. त्यामुळे महिलांचे स्नायू पुरुषांसारखे दिसणं शक्यच नाही. वेट ट्रेनिंग केल्यानं स्नाय फुगीर दिसणार नाही. वेट ट्रेनिंगमुळे कार्डिओ व्यायामापेक्षाही वेगानं उष्मांकाचं ज्वलन होतं. शिवाय हाडांसाठीही वेट ट्रेनिंग गरजेचं असतं.
- व्यायाम सुरु करताना वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. पण मर्यादित वेळेचा विचार करता अनेकजणी थेट व्यायामच करायला लागतात. यामुळे व्यायामादरम्यान स्नायुंना दुखापत होण्याची शक्यता असते. व्यायामादरम्यान स्नायुंच्या हालचाली व्यवस्थित होत नाही. म्हणूनच व्यायामाला पुरेसा वेळ ठेवून व्यायाम सूरु करण्याआधी पाच ते दहा मिनिटं वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग केल्यास जोमदार व्यायाम करण्याचा उत्साह वाढतो. आणि व्यायाम नीट होतो.
- रिकाम्या पोटी व्यायाम केल्यानं आपण लवकर बारीक होवू या समजुतीतून काहीच न करता व्यायाम केला जातो. त्यामुळे व्यायामासाठी ऊर्जा महत्त्वाची असते. म्हणूनच व्यायामाच्या एक तास आधी केळासारखं एखादं फळं, थोडासा नास्ता अशा स्वरुपाचं काहीतरी खाऊन व्यायाम केल्यास व्यायामाला ऊर्जा मिळते. व्यायाम नीट होतो. व्यायामाआधी , व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतर थोडं थोडं पाणी पिणंही गरजेचं असतं. या चुका टाळून व्यायाम केल्यास व्यायाम नीट होतो आणि व्यायामातून अपेक्षित परिणामही साध्य होतात.