Join us  

कंबर- गुडघेदुखी नको असेल तर जाता-येता सहज करा ५ सोपे व्यायाम, सांधेदुखी होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 1:27 PM

Easy Chair Exercises for Joint Pain knee pain back pain : घरच्या घरी खुर्चीचा वापर करुन करता येतील असे सोपे व्यायामप्रकार

कधी जीने चढताना अचानक गुडघ्यात कळ येते, कधी घरातली कामं करताना कंबरेतून चमक येते तर कधी एकाएकी हाताचा एखादा सांधा दुखायला लागतो. असं नेमकं का होतं तर व्यायामाचा अभाव आणि हाडांना, सांध्यांन वंगण नसल्यामुळे त्यांच्यात एकप्रकारची ताठरता येते आणि मग ते दुखायला लागतात. पुरेशी हालचाल नसल्याने सांधेदुखीचे त्रास सुरु होतात. रोजच्या व्यापात व्यायामाला वेगळा वेळ काढणे शक्य नाही, महिलांच्या बाबतीत तर घरकाम, ऑफीस आणि बाकीच्या गोष्टींमध्येच इतके अडकून जायला होते की कितीही ठरवले तरी व्यायाम केला जात नाही. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर घरच्या घरी खुर्चीचा वापर करुन करता येतील असे सोपे व्यायामप्रकार तुम्ही नियमीत करायला हवेत. अगदी जाता-येता करता येतील असे हे व्यायामप्रकार नेमके कसे करायचे पाहूया (Easy Chair Exercises for Joint Pain knee pain back pain)...

१. खुर्चीवरच्या स्क्वाटस 

आपल्या घरात डायनिंग टेबलला, हॉलमध्ये अशा खुर्च्या असतातच. या खुर्च्यांचा बसण्याशिवाय व्यायामासाठीही आपण अतिशय चांगला उपयोग करुन घेऊ शकतो. त्यासाठी खुर्चीवर बसणे आणि परत उठणे, पुन्हा बसणे-उठणे असा सोपा वाटणारा पण सांध्यांसाठी अतिशय फायदेशीर असलेला व्यायामप्रकार करायला हवा. 

(Image : Google)

२. पाय आडवे वर-खाली करणे 

खुर्चीच्या पाठीला धरुन उभे राहायचे आणि डावा पाय डावीकडे किमान ८ ते १० वेळा वरखाली करायचा, तसेच उजव्या पायानेही करायचे. यामुळे खुब्यातील स्नायूंना व्यायाम मिळतो आणि बसून बसून येथील स्नायू आखडले असतील तर ते मोकळे होण्यास मदत होते. 

३. चेअर प्लँक

आपण नियमितपणे जमिनीवर प्लँक मारतो. त्याचप्रमाणे खुर्चीवर दोन्ही हात ठेवून त्यावर प्लँक मारावी. यामुळे खांदे, हात, पाय यांचे स्नायू मोकळे होतात. तसेच यामुळे पाठीला आणि कण्यालाही व्यायाम मिळण्यास मदत होते. 

४. गुडघे हाताला टेकवणे 

आपण जमिनीवर उभे राहून हात काटकोनात करतो आणि उड्या मारुन गुडघे हाताला टेकवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे बसून पाय गुडघ्यातून वर घ्यायचे आणि हाताला लावण्याचा प्रयत्न करायचा. असे २ ते ३ मिनीटे सलग केल्यास त्याचा फायदा होतो. 

५. बॅक किक

खुर्चीच्या पाठीला धरुन उभे राहायचे आणि पाय जांघेतून मागे घेण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे पोट, पाठ, पाय अशा सगळ्याच स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. हे नियमितपणे केल्यास शरीर ठणठणीत राहण्यास मदत होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआरोग्य